‘फ्री बेसिक्स’ची भारतातून माघार
By admin | Published: February 12, 2016 03:57 AM2016-02-12T03:57:20+5:302016-02-12T03:57:20+5:30
प्रमुख सोशल नेटवर्क कंपनी फेसबुकने भारतातील आपला वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने सेवा देणाऱ्या कंपन्यांना कन्टेन्टस्वर आधारित
नवी दिल्ली : प्रमुख सोशल नेटवर्क कंपनी फेसबुकने भारतातील आपला वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने सेवा देणाऱ्या कंपन्यांना कन्टेन्टस्वर आधारित इंटरनेटसाठी वेगवेगळे दर आकारण्यास मनाई केल्यानंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकच्या या निर्णयामुळे भारतात नेट न्यूट्रॅलिटीला प्रोत्साहन मिळण्याची आशा आहे.
दूरसंचार आॅपरेटर्सच्या भागीदारीने लोकांना बेसिक इंटरनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रमामुळे फेसबुकवर चौफेर टीका केली जात होती. हा कार्यक्रम म्हणजे नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्त्वांचे थेट उल्लंघन असल्याचे टीकाकारांचे म्हणणे होते. ‘फ्री बेसिक्स’मुळे काही निवडक वेबसाईटस्च बघण्याची अनुमती देण्यात आली होती. इंटरनेट सर्वांसाठी खुले असावे, असा युक्तिवाद करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
‘भारतातील लोकांना आता फ्री बेसिक्स कार्यक्रम उपलब्ध राहणार नाही,’ असे फेसबुकच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. ही फ्री बेसिक्स सेवा भारतात रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रायच्या निर्देशानंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सने ही सेवा स्थगित केली होती.
इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना वेगवेगळे दर आकारण्यास प्रतिबंध घालण्याच्या ट्रायच्या निर्णयावर फेसबुकच्या संचालक मंडळाचे सदस्य मार्क अँड्रिसेन यांनी टीका केली होती.