खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचण्या मोफत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:23 AM2020-04-02T01:23:24+5:302020-04-02T01:23:46+5:30
सरकारने मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना या चाचण्या करण्याची परवानगी देताना त्यासाठी प्रति चाचणी ४,५०० रुपये आकारण्याची मर्यादा घातली आहे
नवी दिल्ली : सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य केल्या जाव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका करण्यात आली आहे.अॅड. शशांक देव सुधी यांनी ही याचिका केली आहे.
१३५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात अशा आणिबाणीच्या वेळी या चाचण्या करण्यासाठी सरकारी व खासगी मिळून फक्त ११४ एवढ्या खूपच कमी प्रयोगशाळा असल्याने प्रयोगशाळांची आणि तेथे करण्यात येणाºया चाचण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा आदेश द्यावा, अशीही याचिकाकर्त्याचीमागणी आहे.
सरकारने मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना या चाचण्या करण्याची परवानगी देताना त्यासाठी प्रति चाचणी ४,५०० रुपये आकारण्याची
मर्यादा घातली आहे. हे शुल्क नागरिकांच्या समानतेच्या व आरोग्यसंपन्न जीवन जगण्याच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याने खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे शुल्कही बेकायदा ठरवून रद्द करावे, असे याचिके नमूद केले आहे.
भोंदू बाबांचे आश्रम तत्काळ बंद करावेत
अ. भा. संत सम्मेलन या साधूसंतांच्या शीर्षस्थ संस्थेने तीन वर्षांपूर्वी, हजारो भाबड्या भक्तांना नादी लावून त्यांची पिळवणूक करणाºया देशातील ज्या १७ बड्या ‘भोंदू बाबां’ची यादी जाहीर केली आहे, त्यांचे आश्रम, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ बंद व तेथे वेठीस धरलेल्या लोकांची सुटका करावी, यासाठीही एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ज्याची एकुलती मुलगी दिल्लीतील अशाच एका भोंदू बाबाच्या नादी लागली आहे व तिची सोडवणूक करण्यासाठी सरकारी यंत्रणेने काहीही केलेले नाही, अशा सिकंदराबाद येथील एका नागरिकाने ही याचिका केली आहे.