'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:14 IST2025-01-18T13:13:58+5:302025-01-18T13:14:59+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली.

'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
Delhi Election 2025: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. दिल्लीतील भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी पुरवठ्याचा लाभ मिळत नाही. निवडणुकीनंतर आमचे सरकार आले की, आम्ही अशी योजना आणू, ज्यामुळे भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी मिळेल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आम आदमी पक्षाने तयार केलेल्या अनब्रेकेबल या माहितीपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. भाजपने अनब्रेकेबल डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन थांबवले आहे, असा आरोप त्यांनी केला.
"आयटीओवर आधारित एक डॉक्युमेंटरी आज दाखवली जाणार होती. दिल्ली पोलिसांनी त्याचे प्रदर्शन थांबवले. हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. पत्रकारांसाठी खासगी शो होता. भाजपा घाबरली आहे. आप वर आधारित डॉक्युमेंटरीवर बेकायदेशीरपणे रोखण्यात आले आहे. या डॉक्युमेंटरीतून दाखवण्यात आले आहे की, आपने कसा भाजपच्या कटकारस्थांनाचा सामना केला. खासगी शो साठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नसते", असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्ली पोलिसांनी काय केला आहे खुलासा?
"आपच्या अनब्रेकेबल डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनासंदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती आणि हे नियमांचे उल्लंघन आहे. आम्ही सर्व पक्षांना आवाहन करतो की, निवडणूक आचार संहिता आणि कायद्याचे पालन करावं. निवडणूक जाहीर झालेली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांना डीईओ कार्यालयात अर्ज करून परवानगी घ्यावी. ही साधारण प्रक्रिया आहे, अशी भूमिका पोलिसांनी मांडली.