गरीब महिलांना मोफत ‘गॅस’
By Admin | Published: March 11, 2016 03:12 AM2016-03-11T03:12:36+5:302016-03-11T03:12:36+5:30
गरीब महिलांना घरगुती गॅसचे (एलपीजी) कनेक्शन मोफत देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
नवी दिल्ली : गरीब महिलांना घरगुती गॅसचे (एलपीजी) कनेक्शन मोफत देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची घोषणा केली होती.
प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेसाठी तीन वर्षांत आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून दारिद्र्य रेषेखालील महिलांना एलपीजी कनेक्शन पुरविण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले जाईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर करताना जेटलींनी गरिबांना घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. चूल पेटविताना होणारा धूर हा महिलांसाठी शाप आहे, स्वयंपाकगृहात खुल्यारीतीने आग पेटविणे म्हणजे तासाला ४०० सिगारेटी पेटवण्यासारखे आहे. त्यावर उपाय शोधण्याची वेळ आली आहे, असेही जेटली म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)