वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी मोफत मूव्ह ॲप; अपघात टाळण्यासाठी उपयुक्त, खड्ड्यांचीही माहिती देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:44 AM2021-12-21T09:44:47+5:302021-12-21T09:46:21+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मॅप माय इंडिया ही डिजिटल कंपनी व आयआयटी मद्रास यांच्या सहकार्याने बनविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशामध्ये अनेक एक्स्प्रेस वे, हायवे यांचे काम ज्या वेगाने सुरू आहे, त्याच वेगाने अपघातही वाढत आहेत. ते टाळण्यासाठी तसेच प्रवासी व वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी मूव्ह नावाचे ॲप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तयार केले आहे.
रस्त्यांवर होणारे अपघात, स्पीड ब्रेकर, खड्डे यांची माहिती या ॲपद्वारे मिळेल. त्यामुळे अपघात टाळता येतील. मूव्ह ॲप मोफत उपलब्ध असणार आहे.
काय आहे ॲपचे वैशिष्ट्य?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मॅप माय इंडिया ही डिजिटल कंपनी व आयआयटी मद्रास यांच्या सहकार्याने बनविले आहे. रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करण्यासाठी मूव्ह ॲपमध्ये अनेक फीचर्सही देण्यात आले आहेत. एक्स्प्रेस हायवे, हायवेवर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असतात. त्या सर्वांची माहिती या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना मूव्ह ॲपद्वारे मिळेल. इतर रस्त्यांपेक्षा एक्स्प्रेस हायवे, हायवेवर वाहने अधिक वेगाने चालविली जातात. त्यामुळे तिथे अधिक अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या रस्त्यांवरील अपघात व त्यात होणारी मनुष्यहानी यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मूव्ह ॲप उपयोगी आहे.
२०३० पर्यंत निम्म्यांवर अपघात
देशभरात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या २०३० पर्यंत निम्मी कऱण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी मूव्ह या ॲपचा वापर होईल. भविष्यात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी या ॲपमधील माहिती वापरली जाईल.
आयआयटी मद्रासतर्फे विश्लेषण
केंद्र सरकारने गेल्यावर्षी आयोजिलेल्या आत्मनिर्भर ॲप शोध स्पर्धेत मॅप माय इंडियाच्या मूव्ह ॲपने प्रथम क्रमांक पटकाविला होता. आता हे ॲप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशभरातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. या ॲपसाठी जमा होणाऱ्या माहितीचे आयआयटी मद्रास व मॅप माय इंडिया या डिजिटल कंपनीतर्फे विश्लेषण केले जाईल.