एक मुश्त सफाई ठेक्याचा मार्ग मोकळा
By admin | Published: November 22, 2015 12:39 AM2015-11-22T00:39:45+5:302015-11-22T00:39:45+5:30
Next
>जळगाव : शहरात स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी दिशाहीन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने एक मुश्त सफाईचा ठेक्याला मंजुरी दिली असून सोमवारपासून शहरात स्वच्छतेला सुरुवात होणार आहे. स्वच्छतेचा ठेका बंद करण्यापूर्वी महापालिकेने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभेत खान्देश विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी अधिकार्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. स्वच्छता होत नसल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना या परिस्थितीचा विचार न करता मनपाने स्वच्छतेचा ठेका बंद केल्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला. ८७१ कर्मचारी करणार स्वच्छता शहरात स्वच्छता करण्यासाठी मक्केदार लहु रामा पर्वते यांनी मंजूर दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार या मक्तेदाराकडे ३५० कर्मचारी असून महापालिकेच्या आस्थापनेवर ५२१ असे एकूण ८७१ कर्मचारी सोमवारपासून स्वच्छता करणार आहे. दोन महिन्यात निविदा पूर्ण होणार स्वच्छता करण्यासाठी महापालिकेतर्फे नव्याने ई-निविदा प्रक्रिया प्रभाग समिती निहाय काढण्यात येणार आहे. या निविदांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली होती. वास्तविक या निविदा प्रक्रियाला अजून दोन महिने लागणार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ७ लाख रुपयांचा धनादेश मंजूर महापालिकेच्या मालकीच्या वाहनांचे टायर, ट्यूब खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यापार्श्वभूमीवर नवीन टायर, ट्यूब खरेदीसाठी ७ लाख रुपयांचा धनादेश मंजुर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली आहे. लवकरच बंद पडलेल्या वाहनांचे टायर व ट्यूब बदलवून बंद वाहने पूर्ववत सुरू केले जातील, अशी माहिती बरडे यांनी दिली.