"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:23 PM2024-10-15T13:23:11+5:302024-10-15T13:34:33+5:30

निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.

Free schemes given before elections are bribes Supreme Court seeks response from Centre and EC | "निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

Supreme Court : निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याआधी सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या मोफत गोष्टींचे आश्वासन लाच म्हणून घोषित करण्याचे आदेश देणारी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका आधीच्या प्रलंबित प्रकरणांसोबत जोडली आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी दिलेल्या मोफत सुविधांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन्ही राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेसाठी अनेक लोकोपयोगी योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी दरमहा १५०० रुपयांपर्यंतची रोख लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. तर टोल टॅक्समध्ये सूट देण्यासारखे निर्णयही घेण्यात आले आहेत. अशा निर्णयांना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली.

निवडणुकीपूर्वी मोफत योजनांची घोषणा लाच म्हणून जाहीर करावी, अशी मागणी या याचिकेत कोर्टाकडे करण्यात आली होती. हा एक प्रकारे मतदारांना लाच देण्याचा प्रकार आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणं होतं. या अर्जावर सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून त्यांची प्रतिक्रिया मागवली आहे. याशिवाय दाखल केलेल्या याचिकांना आधीच प्रलंबित याचिकांसोबत जोडण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ मोफत योजनांच्या घोषणेवर बंदी घालावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली होती. अशी बंदी केवळ सरकारलाच नाही तर सर्वच राजकीय पक्षांना लागू झाली पाहिजे, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणं आहे.

मोफत सुविधांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी दोन मुख्य याचिका आहेत. कर्नाटकातील शशांक जे श्रीधर यांनी ही नवी याचिका दाखल केली आहे. २०२२ मध्ये भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी या विरोधात जनहित याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. याचिकाकर्ते शशांक जे श्रीधर यांचे वकील बालाजी श्रीनिवासन यांनी सोमवारी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण मांडले होते. विधानसभा किंवा सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान मोफत योजनांचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत लाचखोरी किंवा मतांसाठी प्रलोभन मानले पाहिजे.

दुसरीकडे, अश्विनी उपाध्याय यांनीही या विरोधात जनहित याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना राजकीय पक्षांकडून मोफत सुविधा किंवा मोफत भेटवस्तू देण्याची आश्वासने थांबवण्याचे आवाहन केले होते. निवडणूक आयोगाने अशा पक्षांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
 

Web Title: Free schemes given before elections are bribes Supreme Court seeks response from Centre and EC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.