रेल्वे अॅपवर लवकरच मोफत टीव्ही शो, चित्रपट, बातम्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:32 AM2019-07-22T01:32:09+5:302019-07-22T06:16:14+5:30
प्रवाशांसाठी नवी सुविधा : सर्व स्थानके होणार वाय-फाययुक्त; जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळणार
नवी दिल्ली : रेल्वेची स्थानकांवर वाट पाहणारे किंवा रेल्वेतून जाणारे प्रवासी यांना लवकरच रेल्वेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मोफत अॅपमुळे रेकॉर्ड केलेले मनोरंजन तसेच वृत्तविषयक कार्यक्रम मोफत पाहता येतील.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम रेल्वे बोर्डाने रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. आवडत्या हिंदी मालिका असोत वा रात्री वृत्तवाहिनींवरून प्रसारित होणाºया चर्चा त्या गोष्टी रेल्वे प्रवाशांना पाहता येतील. या अॅपच्या वापरामुळे रेल्वेला जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील १६०० रेल्वेस्थानकांवर याआधीच वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उर्वरित ४७०० स्थानकांवर हे काम येत्या आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. या अॅपच्या माध्यमातून मोबाईलवर विविध दूरचित्रवाहिन्यांच्या मालिका, चित्रपट, गाणी, आध्यात्मिक कार्यक्रम, बातम्या, विविध घडामोडींवर वृत्तवाहिन्यांवरून होणाºया चर्चा हे सारे काही रेल्वे प्रवाशांना पाहता येईल.
हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी झोनल रेल्वे विभागांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांना ती पेलता न आल्याने आता ते काम रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. तशी माहिती रेल्वे बोर्डाने ११ जुलै रोजी काढलेल्या एका आदेशात देण्यात आली आहे. रेलटेलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पुनीत चावला यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी रेलटेललाच रेल्वे बोर्डाने प्राधान्य दिले आहे. आता या कामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल. देशातील विविध विमानतळांनी आपल्या प्रवाशांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वत:चे एफएम चॅनल सुरू केले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांची आवडनिवड लक्षात घेऊन रेलटेल कॉर्पोरेशन या अॅपद्वारे त्यांना मोफत कार्यक्रम दाखविणार आहे.
रेल्वे प्रवाशांना आपल्या मोबाईलवर विविध कार्यक्रम बघण्याची इच्छा असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या रेल्वे यंत्रणा मागे राहू नये म्हणूनही त्याकरिता नवे अॅप रेलटेलकडून विकसित करण्यात येत आहे. मागणी तसा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबायला पाहिजे.
त्यातून मोठा महसूल मिळून रेल्वेला फायदा होईल, असे जानेवारी २०१७ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले होते. विमानांमध्येही प्रवाशांना टीव्ही कार्यक्रम मोफत बघण्याची सोय विमान कंपन्यांनी काढून टाकली. प्रत्येक जण आपला मोबाईल या कामासाठी वापरतो.