महाराष्ट्रात मोफत लस देणं गरजेचं, फडणवीसांची मन की बात
By महेश गलांडे | Published: October 24, 2020 09:35 AM2020-10-24T09:35:25+5:302020-10-24T09:36:54+5:30
बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित केलाय
मुंबई - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा माहोल तापला असून भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना महामारीच्या संकटाचं राजकारण केल्याचं दिसून येतय. कारण, बिहारमध्ये भाजपाची सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याचं आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून दिलंय. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याच आवाहन केलंय. भाजपाच्या या निर्णयावरुन भाजपावर टीका होत आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही मोफत लस मिळालया हवी, अशी मन की बात सांगितली आहे.
बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित केलाय. तर, शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेचे बाण सोडलेत. ''बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपाने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत.बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपाच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे,'' अशा शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.
बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यासंदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. काही लोकं महाराष्ट्र सोडून जगभर बोलतात, तामिळनाडूतील राज्य सरकारने मोफत कोरोना लसीची घोषणा केलीय, आता हेच दुटप्पी लोक टीका करत आहेत, असे म्हणत विरोधी पक्षांकडून सोयीनुसार भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सूचवलंय. कोरोना संदर्भात केंद्र सरकार नक्कीच योजना आणेल, पण राज्यानेही त्यात भर घालावी लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे
लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यांना बिहारात सत्ताबदल करायचा आहे. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? स्वातंत्र्यपूर्व काळात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगी’ असा मंत्र होता. तो भारतमातेचा आक्रोश होता. त्याच धर्तीवर ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे!’ असा नारा दिलेला दिसतोय.
इतर राज्यांनी पुतीनकडून लस मागवायची काय
बिहारच्या निवडणुकीतून ‘विकास’ हरवला आहे. रोटी, कपडा, मकान, रोजगार हे मुद्दे चालत नाहीत. कारण त्याबाबत सगळा दुष्काळच आहे. सर्वत्र बेरोजगारी व गरिबीचा कहर आहे. त्यावर उतारा म्हणून मोफत लस टोचण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यांत भाजप विचारांची सरकारे नाहीत. दिल्ली प्रदेशात केजरीवाल भाजपा विरोधाचा झेंडा घेऊन उभे आहेत. या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?