सीमेलगतची गावे मोकळी करा!

By admin | Published: October 4, 2016 03:55 AM2016-10-04T03:55:00+5:302016-10-04T03:55:00+5:30

सीमेलगतच्या पाच गावांतील महिला, मुलांना स्थलांतरित करा, असे आवाहन बीएसएफने केले आहे.

Free villages! | सीमेलगतची गावे मोकळी करा!

सीमेलगतची गावे मोकळी करा!

Next

जैसलमेर : सीमेलगतच्या पाच गावांतील महिला, मुलांना स्थलांतरित करा, असे आवाहन बीएसएफने केले आहे. दोन देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन ते पाच कि.मी.मधील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
भारताने पाकव्याप्त काश्मिरात घुसून कारवाई केल्यानंतर दोन देशांतील तणाव वाढला आहे. येथील स्थानिक रहिवासी लहू सिंग सोधा यांनी सांगितले की, बीएसएफचे अधिकारी आणि पटवारी यांनी गेल्या दोन दिवसांत लुनार, कारडा, पोछिना, गुजनगढ, मिथदाऊ या गावांना भेटी दिल्या. गावातील महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. तथापि, कोणत्याही क्षणी गाव रिकामे करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो, असेही या गावकऱ्यांना सांगण्यात आले आहे. काही गावकऱ्यांनी या पूर्वीच या भागातून स्थलांतर केले आहे.
जिल्हाधिकारी सुधीर शर्मा यांनी सांगितले की, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पटवारी, तहसीलदार यांना गावातील नागरिकांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या गावकऱ्यांचे शेत सीमेच्या जवळ आहे, त्यांनी शेतात सीमेपासून किमान ५०० मीटर दूर राहावे,’ अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


बीएसएफचा गोळीबार
गुरदासपूर : आंतरराष्ट्रीय सीमेनजीक रविवारी रात्री संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गोळीबार केला. गुरदासपूर जिल्ह्यातील चक्री सीमा चौकीवर तैनात बीएसएफ जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेलगत संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्यांनी हवेत गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. नंतर या हालचाली मोकाट गुरांच्या असल्याचे आढळून आले, असे बीएसएफने सांगितले. भारतीय जवानांनी हवेत गोळीबार केला. पाककडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला गेला नाही.


राजकारण करू नये
पाकव्याप्त काश्मिरातील भारताच्या कारवाईनंतर विरोधकांनी भडक विधाने केली आहेत. मात्र, या विषयाचे राजकारण करू नये, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केले. सीमावर्ती भागात दौरा केल्यानंतर ते म्हणाले, ‘देशावर युद्धाचे ढग असताना काही नेते याला राजकीय स्वरूप देत आहेत, हे दुर्दैवी आहे.’ काँग्रेसचे पंजाबचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.


लोक अजूनही गावांमध्येच
सीमेलगतची गावे मोकळी करण्याचे आवाहन बीएसएफने केले असले, तरी अनेक गावांमध्ये अजूनही काही नागरिक आहेत. कोणत्याही क्षणी त्यांना गावाबाहेर जावे लागू शकते.

सीमेलगतच्या रहिवाशांसाठी जम्मूत १०० शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत, पण शेतीवाडी आणि जनावरे यांचे कारण देतअनेक नागरिक पुन्हा घराकडे परतू लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू भागात तीन जिल्ह्यांत सुरक्षित शिबिरात राहणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे.
कठुआचे उपायुक्त रमेश कुमार यांनी सांगितले की, शिबिरातील २५० लोक येथून पळून गेले आहेत. या भागातील ३४ शिबिरांत १५ हजार लोक राहतात, तर अन्य २० शिबिरांपैकी तीनच शिबिरांत लोक राहतात. बहुतांश लोक आपल्या घरी परतले आहेत. सीमावर्ती सांबा भागातील २५ हजार लोकांना आपत्कालीन परिस्थितीचा फटका बसू शकतो.

Web Title: Free villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.