दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिका'चा दर्जा; पाकिस्तानी मीडियाची नापाक हेड'लाईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:15 PM2019-02-15T13:15:41+5:302019-02-15T13:18:39+5:30
पाकिस्तानी माध्यमांकडून पुलवामा हल्ल्याचं उदात्तीकरण
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीमारेषेवर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानमधील मीडियाने या हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक म्हटले आहे. तर, या हल्ल्यात 44 भारतीय सैनिकांना ठार केल्याचं पाकिस्तानी मीडियाकडून सांगण्यात येत आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे. त्यातच, पाकिस्तानमधील द नेशन या वृत्तपत्राने हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighter) म्हटले आहे. भारताच्या जखमेवर मीठ चोळायचं काम पाकिस्तानच्या माध्यमांकडून करण्यात येत आहे. तसंच या वृत्तपत्रानं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद या संघटनेनं हा हल्ला घडवल्याचं वृत्तही संघटनेच्या प्रवक्त्याच्या हवाल्यानं फेटाळलं आहे. तर भारतव्याप्त काश्मीरमधील तरुणाईचं हे कृत्य असल्याचंही या वृत्तात म्हटलंय.
पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी 350 किलो आरडीएक्सचा साठा ठेवला होता. जवानांची बस या रस्त्यावरुन जात असताना स्फोटकांनी भरलेल्या कारनं बसला धडक दिली. यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या हल्ल्यात 37 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उरी हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लष्कराने त्या हल्ल्याला मिशन 'सर्जिकल स्ट्राईक' हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकद जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.