मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत जाळल्याचे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:40 AM2023-07-24T05:40:28+5:302023-07-24T05:40:39+5:30
आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून अकल्पनीय घटना समोर येत आहेत.
सेरो (मणिपूर) : आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून अकल्पनीय घटना समोर येत आहेत. ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात, एका स्वातंत्र्यसैनिकाची ८० वर्षीय पत्नी इबेतोम्बी यांना घरात बंद करून एका सशस्त्र गटाने घर पेटवून दिले. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घरावर हल्ला सुरू झाला तेव्हाच त्यांनी आपल्या नातवंडांना पळून जाण्यास सांगितले आणि नंतर परत या मला न्यायला, असे त्या म्हणाल्या. तेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले.
२८ मे रोजी काय घडले?
इबेतोम्बी यांचे पती एस. चुरचंद सिंग ८० व्या वर्षी मरण पावले. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना सन्मानित केले होते.
इबेतोम्बी यांची नात प्रेमकांता हिने सांगितले की, तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी धाव घेण्यापूर्वीच घराला आगीने संपूर्ण वेढले होते.
स्वत: प्रेमकांता थोडक्यात बचावल्या. त्यांनी आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला आणि जांघेत गोळ्या लागल्या.
मिझोराममध्ये पडसाद
शेजारच्या मिझोराममध्ये भूमिगत मिझो नॅशनल फ्रंटची संघटना पीस ॲकॉर्ड एमएनएफ रिटर्निज असोसिएशनने मैतेईंना राज्य सोडण्याची धमकी दिल्याने हजारो लोकांना पलायन करावे लागले आहे.
शाळा, घर जाळले
शनिवारी चुराचंदपूर आणि इम्फाळजवळ मैतेई व कुकी समुदायांमध्ये रात्रभर गोळीबार झाला. बिष्णुपूरमधील थोरबुंग येथे जमावाने एक शाळा आणि अनेक घरे जाळली. यावेळी स्वयंचलित बंदुका, पोम्पे गन, स्फोटकांनी हल्ला करण्यात आला.