जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:24 PM2021-11-24T14:24:14+5:302021-11-24T14:24:41+5:30
या यात्रेत ज्येष्ठ व्यक्तींना विनामूल्य रामललाचे दर्शन घडवले जाईल. तसेच, ज्येष्ठांसोबत एका व्यक्तीला जाण्याची परवानगी असेल.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी अयोध्या तीर्थयात्रेबाबत मोठी घोषणा केली आहे. तीर्थयात्रा योजनेंतर्गत दिल्लीतील ज्येष्ठांना मोफत अयोध्या यात्रा जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची पहिली ट्रेन येत्या 3 डिसेंबरला निघेल. दिल्ली सरकारच्या ई-पोर्टलद्वारे यासाठी नोंदणी करता येईल. या योजने अंतर्गत हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांच्या तीर्थक्षेत्रांनाही यात्रा केली जाईल.
याबद्दलची माहिती देतना केजरीवाल म्हणाले की, अयोध्येत जाऊन रामलालचे दर्शन घेतल्यानंतर दिल्लीतील ज्येष्ठांनाही राम मंदिराच्या दर्शनाची व्यवस्था करावी, असे मला वाटले होते. यानुसरार मी अयोध्येचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. आज मला हे कळवताना अतिशय आनंद होत आहे की, अयोध्येसाठी नोंदणी सुरू झाली आहे आणि पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघेल.
वृद्धासोबत एका व्यक्तीला जाण्यास परवानगी
केजरीवाल पुढे म्हणाले की, वृद्धांसाठी हा प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे आणि वृद्धासोबत एका व्यक्तीला येण्याची परवानगी आहे. दिल्लीतील ज्येष्ठांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही उत्तम हॉटेल्स आणि एसी गाड्यांची व्यवस्था केली आहे. पहिल्या ट्रेनची नोंदणी संपल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही. लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रेनची व्यवस्था करून आणि सर्वांना रामललाचे दर्शन घडवू, असेही ते म्हणाले.
ख्रिश्चन मंदिराचाही समावेश
सीएम केजरीवाल पुढे म्हणाले की, ख्रिश्चन समाजातील लोकांची तक्रार होती की या योजनेत त्यांच्या कोणत्याही धार्मिक स्थळाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यादृष्टीने वेलंकन्नी चर्चच्या दौऱ्याचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्याच्या नोंदणीबद्दल लवकरच माहिती दिली जाईल.