वादळाने हलली मालगाडी; खाली झाेपलेले ६ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:44 AM2023-06-08T08:44:20+5:302023-06-08T08:45:50+5:30
असा घडला अपघात
भुवनेश्वर: ओडिशातील जजपूर क्याेंझर रेल्वेस्थानकानजीक बुधवारी मालगाडीखाली चिरडून सहा कंत्राटी कामगार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गेल्या २ जून रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वेगाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा त्या राज्यात रेल्वे अपघात झाला आहे.
अचानक पाऊस आल्याने या आठ कामगारांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आश्रय घेतला. मात्र ही मालगाडी अचानक सुरू झाली व त्याखाली सहा कामगार चिरडून ठार झाले. जखमी झालेल्या दोन जणांवर कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
असा घडला अपघात
रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, हे कामगार रेल्वेरुळांलगत काम करत होते. त्यावेळी तिथे एक मालगाडी उभी होती. पावसापासून वाचण्यासाठी आठ कामगारांनी त्या मालगाडीखाली आश्रय घेतला. तिला इंजिन जोडलेले नव्हते. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोर इतका होता की, रेल्वेमार्गावर उभे असलेल्या मालगाडीचे डबे हलू लागले. त्याखाली चिरडून कामगारांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)