Sandeshkhali : संदेशखळीत गोंधळ, संतप्त लोकांनी शहाजहानच्या ठिकाणांवर लावली आग; भाजपा नेत्यांची पोलिसांशी झटापट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 02:16 PM2024-02-23T14:16:56+5:302024-02-23T14:17:37+5:30
Sandeshkhali Row : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले.
Sandeshkhali Row (Marathi News) संदेशखळी प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून अशांत असलेल्या संदेशखळीमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी संतप्त लोकांनी फरार टीएमसी नेता शहाजहान शेखच्या ठिकाणांवर आग लावली. ज्या ठिकाणावर लोकांनी आग लावली, ती जागा शाहजहान शेखचा भाऊ सिराजची असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले.
भाजपाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ पीडित महिला आणि स्थानिक लोकांची भेट घेण्यासाठी आज संदेशखळी दौऱ्यावर आहे. यावेळी भाजपाचे शिष्टमंडळ संदेशखळी येथे जाताना पोलिसांना त्यांना अडविले. यादरम्यान भाजपा नेत्या आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजपाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा प्रदेश युनिटचे सरचिटणीस लॉकेट चॅटर्जी आणि अग्निमित्रा पॉल करत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे शिष्टमंडळही आज संदेशखळीला भेट देणार आहे. तसेच, संदेशखळी हिंसाचारावर मानवाधिकार आयोगाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकार आणि राज्याचे डीजीपी यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
#WATCH | West Bengal | BJP MP and State General Secretary Locket Chatterjee and Police officer enter into a verbal altercation.
— ANI (@ANI) February 23, 2024
BJP women's delegation was stopped by state Police as they headed towards Sandeshkhali. pic.twitter.com/WL4rDU5Ude
गुरुवारी राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या शिष्टमंडळानेही संदेशखळीला भेट देऊन पीडितांशी संवाद साधला. आदिवासी आयोगाच्या पथकाचे नेतृत्व आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष अनंत नायक यांनी केले. आदिवासी आयोगाकडे जमिनीवर अवैध कब्जा आणि लैंगिक शोषणाच्या २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्य आरोपी टीएमसी नेता शाहजहान शेख हा ५ जानेवारीपासून फरार आहे. तसेच, रेशन घोटाळ्याप्रकरणी ५ जानेवारीला ईडीची टीम त्याच्या आवारात छापा टाकण्यासाठी गेली होती, मात्र शाहजहान शेखच्या समर्थकांनी ईडीच्या टीमवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ईडीचे अधिकारी जखमी झाले. त्या घटनेपासून शाहजहान शेख हा फरार आहे.
शाहजहान शेखविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा
रेशन घोटाळा आणि ईडी टीमवरील हल्ल्याच्या प्रकरणात अडकलेले टीएमसी नेता शाहजहान शेखच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. दरम्यान, ईडीने शाहजहान शेख विरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे. संदेशखळी येथील लोकांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेशखळीच्या लोकांनी आरोप केला आहे की, शाहजहान शेखने त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि स्थानिक महिलांनी टीएमसी नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोपही केला आहे.