गरिबांसाठी सोसायटीबाहेर उभा केला फ्रिज
By Admin | Published: June 27, 2017 12:12 PM2017-06-27T12:12:57+5:302017-06-27T12:12:57+5:30
गरिब आणि गरजूंना पोट भरण्यासाठी अन्न मिळावं यादृष्टीने गुडगावमधील एका सोसायटीने फ्रिज लावला आहे
>ऑनलाइन लोकमत
गुडगाव, दि. 27 - गरिब आणि गरजूंना पोट भरण्यासाठी अन्न मिळावं यादृष्टीने गुडगावमधील एका सोसायटीने फ्रिज लावला आहे. सेक्टर 54 मध्ये असणा-या सनसिटी सोसायटीमधील रहिवाशांनी हा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे. रहिवाशांनी सोसायटीच्या गेटवर एक फ्रिज ठेवला असून, सोसायटीमधील किंवा बाहेरील कोणाला उरलेलं अन्न ठेवायचं असेल तर ते या फ्रिजमध्ये ठेवू शकतात. ज्या गोरगरिब किंवा गरजूंना भूक आहे, मात्र खिशात दमडी नाही ते कोणालाही न विचारता फ्रिजमधील हे अन्न घेऊ शकतात.
तसं पाहायला गेलं तर, सर्वच घरांमध्ये रात्री जेवून झाल्यानंतर उरलेलं अन्न कच-याच्या डब्यात टाकलं जातं. यामुळे हे अन्न कोणाच्याच वाट्याला न येता कच-यात जमा होतं. यामुळे एखाद्या भुकेल्याच्या तोंडापर्यंतही ते पोहोचत नाही. मात्र सनसिटी सोसायटीने आता हे अन्न गरिब आणि भुकेलेल्यांपर्यत पोहोचवण्यासाठी पाऊल उचललं आहे. सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी मिळून एक फ्रिज सोसायटीच्या गेटवर ठेवला आहे.
""सोसायटीमधील काही इच्छुक आपल्या घरातील उरलेलं अन्न एका डिस्पोजेबल प्लेट किंना बॉक्समधून या फ्रिजमध्ये ठेवतील. गरजू आणि गरिब लोक हे अन्न घेऊ शकतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने अन्न खराब होणार नाही, आणि वेळेत त्याचा फायदा घेता येईल"", अशी माहिती अभय पुनिया यांनी दिली आहे.
या उपक्रमाचा फायदा घेतला जावा यासाठी येथील रहिवाशी जवळपास असणा-या गरजू लोकांना माहिती देतील. जवळच असणा-या झोपडपट्ट्या तसंच रस्त्यांवर राहणा-यांना जाऊन या उपक्रमाबद्दल सांगण्यात येईल, जेणेकरुन लोकांना याचा फायदा होईल.