बलात्कार होताना मित्र नुसते पाहत राहिले
By admin | Published: September 18, 2016 06:00 AM2016-09-18T06:00:06+5:302016-09-18T06:00:06+5:30
आमच्यावर सामूहिक बलात्कार होत असताना आमचे मित्र मूकदर्शक बनले होते.
नवी दिल्ली : आमच्यावर सामूहिक बलात्कार होत असताना आमचे मित्र मूकदर्शक बनले होते. त्यांनी आम्हाला वाचविण्याचा जराही प्रयत्न केला नाही, असे दोन किशोरवयीन मुलींनी बुधवारी पोलिसांना सांगितले. दिल्लीच्या किराडी भागात ५ तरुणांच्या वासनेला बळी पडलेल्या या मुलींना आपबिती सांगताना अनेकदा रडू कोसळले.
ते (मित्र) मदतीला धावून येतील व आम्हाला वाचवतील, अशी आशा होती. आम्ही मदतीसाठी टाहो फोडत होतो; परंतु ते जागचे हललेसुद्धा नाहीत. कोपऱ्यात चुपचाप बसून त्यांनी सगळा प्रकार पाहिला. आम्ही जीवाच्या आकांताने ओरडत असूनही त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्नही केला नाही, असे या मुलींनी सांगितले.
या मुली (वय १७ व १८ वर्षे) त्यांच्या मित्रांसोबत मुंडका मेट्रो स्थानकाजवळ एका निर्जनस्थळी बसल्या होत्या. तेव्हा नराधमांनी त्यांना गाठले आणि मुलींची छेड काढली. त्यामुळे मुली उठल्या आणि तेथून निघून जाऊ लागल्या. तेव्हा आरोपींनी त्यांना पकडले व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. त्यानंतर मुलींना ओढत आणखी काळोख्या ठिकाणी नेऊन तेथे आळीपाळीने त्यांच्यावर बलात्कार केला. पण त्यांच्या मित्रांनी प्रतिकार केला नाही. बलात्कारानंतर आरोपी पळून गेले. त्यानंतर मुलींनीच पोलिसांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. या भागात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.
काँग्रेसचे नेते प्रत्युष कांत म्हणाले की, आमचा भाग गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे. किराडी मतदारसंघात पोलीस स्टेशन नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारांचा बिनदिक्कत वावर आहे. लोकांना तक्रार करण्यासाठी १० कि.मी. अंतरावर बावना येथे जावे लागते. या भागात एकही सुरक्षा कॅमेरा नसून पोलीसही गस्त घालत नाहीत.
पोलिसांनी गुरुवारी दोन तरुणांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना पकडले. एक युवक पळून गेला. पाचव्या तरुणाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>या वर्षाच्या प्रारंभी ८ वर्षीय मुलीचे अपहरण व बलात्कार झाला होता. याच ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या भागात पुरेसे पथदिवे नाहीत. पथदिवे वाढविण्याची वारंवार मागणी करूनही उपयोग झाला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.