जिवंत असेपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री; नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:57 AM2023-10-20T05:57:00+5:302023-10-20T05:57:11+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री कायम राहील, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मोतिहारीमधील केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.
नितीशकुमार म्हणाले, त्यांच्याशी आमचे जुने नाते आहे. आज भलेही ते आमच्यापासून वेगळे झाले आहेत. येथे जेवढे आहेत, तेवढे सर्व आमचे मित्र आहेत. आपली मैत्री कधीही संपणारी नाही.
भाजपशी मैत्री नाही
नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर राजदचे मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव म्हणाले की, भाजपशी मैत्री करणे कधीच शक्य नाही. यादव यांच्या वक्तव्यावरून राजदमध्ये नितीशकुमार यांच्याबाबत अस्वस्थता असल्याचे दिसून येते.
गांधींजींकडून सामाजिक एकतेचे दर्शन : मुर्मु
महात्मा गांधींनी एक शतकापूर्वी मांडलेला सामाजिक समता, एकतेचा दृष्टिकोन देशाला आधुनिक व विकसित राष्ट्र बनण्यासाठी आजही समर्पक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी यावेळी केले.
मोतिहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना राष्ट्रपतींनी ‘चंपारण्य सत्याग्रह’चे विविध पदर उलगडून दाखविले. गांधीजींच्या विचारातून देश मार्गक्रमण करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.