एप्रिलपासून ‘या’ वस्तू आणखी महाग होणार; सर्वसामान्यांना फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:21 AM2022-02-15T07:21:04+5:302022-02-15T07:24:56+5:30
देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनास चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दुहेरी तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनास आणखी गती देण्यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून १ एप्रिलपासून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होतील, तसेच काही स्वस्त होतील, असे अमेरिकी लेखा संस्था ‘ग्रँट थॉर्नटन’ने म्हटले आहे.
देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनास चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दुहेरी तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे उत्पादनांच्या सुट्या भागांना कर सवलत देण्यात आली असतानाच काही सुट्या भागांच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत फेरबदल होतील, असे थॉर्नटनने म्हटले आहे.
स्मार्टफोन होणार स्वस्त
मोबाइल फोन चार्जरचे ट्रान्सफॉर्मर, कॅमेरा मोड्यूल आणि अन्य उपकरणांवरील सीमा शुल्कात ५ ते १२.५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. कंपन्यांनी हा लाभ ग्राहकांपर्यंत हस्तांतरित केल्यास स्मार्ट फोन स्वस्त होतील, असे थॉर्नटनने म्हटले आहे. स्मार्ट वॉच, फिटनेस बँड स्वस्त होणार, स्मार्ट वॉचच्या काही सुट्या भागांवरील सीमा शुल्क सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ही उत्पादने आणखी स्वस्त होऊ शकतात.
वायरलेस इअरबड्स महागणार
वायरलेस इअरबड्स, नेकबँड हेडफोन्स आणि यांसारख्या इतर गॅझेट्सवरील आयात करात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही उत्पादने महागण्याची शक्यता आहे.
प्रीमियम हेडफोन महागणार
हेडफोनच्या थेट आयातीवर आता २० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रीमियम हेडफोनच्या किमती महागतील. सूत्रांनी सांगितले की, अर्थसंकल्पातील तरतुदी १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात लागू होणार आहेत. त्यामुळे कोणत्या उत्पादनाच्या किमतीत किती फरक झाला, हे पाहण्यासाठी १ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फ्रीज महागणार
काॅम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुट्या भागांवरील आयात करात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फ्रीज महागतील.