भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 03:56 PM2024-06-29T15:56:21+5:302024-06-29T16:27:55+5:30
JDU Politics: नितीशकुमार सध्या एनडीएत आहेत. ते कधी नाराज होऊन बाहेर पडतील याची वाट विरोधक पाहत आहेत. नितीशकुमारांनी ८ ते ९ वेळा सत्तेतील साथीदार बदलले आहेत.
बिहारचे सर्वाधिक अविश्वासू नेते नितीशकुमार कधी कोणती चाल खेळतील याचा नेम नाही. गिरे तो भी टांग उपर प्रमाणे नितीशकुमार कोणाचीही साथ सोडून कोणा सोबतही आघाडी करोत, मुख्यमंत्री म्हणूनच सत्तेत विराजमान होणार ही त्यांची खासीयत. काही वर्षांपूर्वी नितीशकुमारांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडत विश्वासातील नेत्याला त्याजागी बसविले होते. तेव्हा त्यांनी उत्तराधिकारी निवडल्याची चर्चा होती. परंतू, लगेचच नितीशकुमारांनी पलटी मारत त्या नेत्याला पायउतार करायला भाग पाडले होते. अशा नितीशकुमारांनी भाजपातून राजकीय क्षेत्रात आलेल्या एका नेत्याला पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष घोषित केले आहे.
नितीशकुमार सध्या एनडीएत आहेत. ते कधी नाराज होऊन बाहेर पडतील याची वाट विरोधक पाहत आहेत. नितीशकुमारांनी ८ ते ९ वेळा सत्तेतील साथीदार बदलले आहेत. आलटून पालटून नितीशकुमार साथीदार बदलत राहतात. खरेतर लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात विरोधकांची एकी करणारे तेच होते, परंतू अचानक काही कारणामुळे नाराज झाले आणि कधी एनडीएत जाऊन बसले हे बिहारीबाबूंनाही कळले नाही. आता नितीशकुमारांनी दिलेल्या एका टेकूवर मोदी सरकार तग धरण्याचा प्रयत्न करत आहे.
या नितीशकुमारांनी गेल्या काही वर्षांत दोनदा पक्षाचा अध्यक्षपद बदलला आहे. आज जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीतील बैठकीत नितिशकुमार यांनी संजय झा यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे. नितीशकुमार यांनी झा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. याला सर्व नेत्यांनी संमती दिली. संजय झा हे नितीशकुमार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या झा यांच्या शिष्टाईमुळेच नितीशकुमार लोकसभेआधी भाजपासोबत गेले होते.
संजय झा हे जदयूचे राष्ट्रीय महासचिवही आहेत. भाजपात असताना ते विधान परिषदेचे सदस्यही होते. संजय झा यांच्याविरोधात एकही गुन्हा नोंद नाही, ही त्यांची एक जमेची बाजू राहिली आहे. महत्वाची बाब म्हणजे झा हे भाजपा नेते अरुण जेटली यांचे देखील जवळचे होते. २०१४ मध्ये त्यांनी दरभंगा येथून लोकसभा लढविली होती. परंतू पराभत व्हावे लागले होते. २०१९ मध्ये भाजपाला ही जागा गेल्याने त्यांनी तयारी करूनही तिकिट मिळाले नव्हते.