महागाईचा फटका! सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; रोजच्या वापरातील 'या' वस्तू महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:30 PM2022-05-05T16:30:21+5:302022-05-05T16:39:18+5:30
भारतातील सर्वात मोठा FMCG ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने आपल्या उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. मनीकंट्रोलने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. साबण, शॅम्पू, पावडर यासह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. CNBC TV-18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठा FMCG ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने आपल्या उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. मनीकंट्रोलने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
रिपोर्टनुसार, 125 ग्रॅम पिअर्स साबणाच्या किमतीत 2.4% आणि मल्टीपॅकमध्ये 3.7% ने वाढ झाली आहे. काही मल्टीपॅक प्रकारांसह लक्स साबणाची किंमत 9% वाढली आहे. कंपनीने सनसिल्क शॅम्पूच्या किमतीतही 8 ते 10 रुपयांनी वाढ केली आहे. Clinic Plus Shampoo 100 ml च्या किंमतीत 15% वाढ करण्यात आली आहे.
साबण आणि शॅम्पू व्यतिरिक्त, स्किन क्रीम ग्लो अँड लव्हलीच्या किमतीत 6-8% वाढ झाली आहे. पॉन्ड्सच्या टॅल्कम पावडरच्या किमतीतही 5 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने एप्रिलमध्ये त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत शेवटची वाढ केली होती. एफएमसीजी ब्रँड्सच्या या मोठ्या कंपनीने स्किन क्लीनिंग आणि डिटर्जंटच्या किमती 3-20 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.
2 मे रोजी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत, HUL CEO आणि MD संजीव मेहता म्हणाले की, त्यांनी कंपनीत घालवलेल्या 30 वर्षांत इतकी महागाईची परिस्थिती पाहिली नाही. त्यांना नजीकच्या भविष्यात आणखी कठीण काळ येऊ शकतो, परंतु त्यांना विश्वास आहे की भारत FMCG कंपन्यांसाठी एक मोठी बाजारपेठ बनून राहील आणि या कठीण काळाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.