मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:13 PM2024-08-06T16:13:24+5:302024-08-06T16:18:10+5:30
श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे.
नवी दिल्ली - भारताशेजारील राष्ट्र बांगलादेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे. तिथल्या परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्यांची कट्टर शत्रू खालिदा जिया कुठल्याही क्षणी जेलच्या बाहेर येऊ शकते. त्यात खलिदा यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने संसद भंग करून लवकरात लवकर अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बांगलादेशातील या स्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहतो. बांगलादेशातील या अराजकतेमागे चीनचा हात असल्याचं बोललं जातं.
रिपोर्टनुसार, चीन एक एक करून भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये अराजकता निर्माण करत आहे. त्याचे प्रमुख कारण चीनवर या देशांचं अवलंबून राहणे आणि भारतासोबत संबंध बिघडवणे. पाकिस्तानपासून अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीवसारखे देश उदाहरण आहेत. आता या यादीत बांगलादेशचा समावेश झाला आहे. शेख हसीना यांची अवामी लीग पार्टी भारताचे समर्थक मानले जातात. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत दिर्घकाळ भारताचे बांगलादेशासोबत चांगले संबंध राहिले आहेत.
तर दुसरीकडे खालिदा जिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी चीनची हस्तक मानली जाते. चीनबाबत त्यांची धोरणे कायम सॉफ्ट राहिली आहेत. त्यामुळे बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीची सत्ता चीनला पसंत नव्हती. सध्या बांगलादेशात जी परिस्थिती उद्भवली आहे त्याचा सर्वाधिक फायदा चीनला होणार आहे. शेख हसीना मागील महिन्यात १० तारखेला चार दिवसीय चीन दौऱ्यावर होती. त्यावेळी चीनसोबत २० करार होणार होते. मात्र हा दौरा अर्धवट सोडून त्या ढाकाला परतल्या होत्या. त्यांचा दौरा अर्धवट सोडण्यामागचं कारण स्पष्ट नव्हते. मात्र ज्या उद्देशाने शेख हसीना चीनला गेल्या होत्या ते पूर्ण झालं नाही. त्यामुळे शेख हसीना रागावून पुन्हा बांगलादेशी आल्या.
पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला
बांगलादेश एकमेव राष्ट्र नाही जो चीनच्या कुटील रणनीतीचा बळी पडला आहे. याआधी पाकिस्तानसोबत असेच झाले. आर्थिक संकटातून राजकीय उलथापालथीत देशाला कर्जात बुडवणं ही चीनची जुनी रणनीती आहे. चीन या स्ट्रॅटर्जीनुसार सर्वात आधी गरजू देशांना भरमसाठ कर्ज देते. हे कर्ज त्या देशातील मोठे प्रोजेक्टस अथवा इन्फास्ट्रक्चर गहाण किंवा भाड्याने दिले जाते. त्यानंतर कर्जाची परतफेड न झाल्यास चीन त्यावर कब्जा करते.
मालदीव फसला, श्रीलंकाही डुबली
चीनच्या कुटील रणनीतीमुळे मालदीवही फसला आणि श्रीलंकाही कर्जात बुडाली. मालदीवमधील मुइज्जू सरकार चीन समर्थक मानलं जाते. त्यामुळे सुरुवातीपासून मालदीव भारत सरकारवर निशाणा साधत आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्विपला गेले त्यानंतर मालदीव सरकारमधील ३ मंत्र्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे भारत आणि मालदीव या दोन्ही देशांतील संबंध ताणले. यावेळी मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले. त्यानंतर त्यांनी भारताला लक्ष्य केले. परंतु भारताच्या वादामुळे मालदीवमधील टूरिज्म इंडस्ट्रीला मोठा फटका बसला. भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे सोडले.
नेपाळमध्येही चीन समर्थक सरकार
नेपाळमध्ये अलीकडेच सत्ता परिवर्तन झालं आहे. त्याठिकाणी चीन समर्थक केपी शर्मा ओली पंतप्रधानपदी आलेत. मागील काही महिन्यात नेपाळमध्ये राजकीय उलथापालथी झाल्या. ओली तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेत. मागील कार्यकाळात नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत.
बांगलादेशावर भारताची भूमिका
बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरलेत. तिथे अल्पसंख्याक हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. अल्पसंख्याकांच्या या स्थितीवर सरकार लक्ष देतंय. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ले केलेत. त्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. राजीनाम्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली होती असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत सांगितलं.