पीएम योजनेच्या नावावर ठगबाजी; सरकारचे कारवाईचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:35 AM2019-06-03T02:35:00+5:302019-06-03T06:20:39+5:30
बनावट वेबसाईटच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळविण्याचा उद्योग
नवी दिल्ली : बनावट वेबसाईटमार्फत ठगबाजी करणाऱ्यांनी पंतप्रधान आवास, मेक इन इंडिया किंवा अन्य योजनेला सोडले नाही. या योजनांच्या नावावर लोकांची दिशाभूल करून देशभरात ठगबाजी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने कारवाईचे निर्देश जारी केले आहेत.
सोशल मीडियावर झळकलेल्या एका संदेशात म्हटले होते की, नरेंद्र मोदी देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानिमित्त ‘मेक इन इंडिया’ योजनेतहत दोन कोटी युवकांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. आतापर्यंत यासाठी ३० लाख युवकांना अर्ज केले आहेत. आता तुम्हीही या जाळ्यात अडकू शकता? एका संदेशात मोफत सोलार पॅनलचे आमिष दाखवून ठकविण्यात आले आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त एक अर्ज करावा लागेल. यासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०१९ आहे, असे या संदेशात म्हटले आहे. (सोबत एचटीटीपी :// सोलार-पॅनल डॉट सरकारी योजना डॉट इन/हॅशटॅग अशी लिंक देण्यात आली आहे.) तथापि, सरकारी योजनांच्या नावावर फसवणूक करण्यांविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
यावर्षी जानेवारीत पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने या ठगबाजांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून २४ ते ४८ तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले.बनावट वेबसाईट चालविणार ठगबाज लोकांचा डाटा चोरी करतात आणि हा डाटा विकून कमाई करतात. यामुळे वैयक्तिक माहितीही हस्तगत केली जाऊ शकते. पोलिसांनी अलीकडेच बनावट वेबसाईट चालविणाºया राकेश जांगिड (नागौर, राजस्थान) याला अटक केली. केले. आयआयटी कानपूरचा पदव्युत्तर असलेला राकेश चुलत भावासोबत जाहिरातींच्या माध्यमातून ही वेबसाईट चालवीत होता. पोलिसांनी ३० मे रोजी त्याच्याविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यातहत गुन्हा दाखल केला असून त्याचे कॉम्प्युटरही जप्त केले आहे.
आवास योजनेच्या नावावर गंडा
ठगबाज पंतप्रधान आवास योजनेच्या नावावरही बनावट वेबसाईट बनवितात. यावर नोंदणी करणाºयांना घर देण्याचे आश्वासन देतात. नोंदणीच्या नावाने ३ ते ५ हजार रुपये शुल्क म्हणून वसूल करतात. शुल्क अदा केल्यानंतर वेबसाईट बंद होते. सोबत देण्यात आलेला फोन नंबरही बंद होतो.
मेक इन इंडियाचा लोगो...
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानिमित्त मोफत लॅपटॉपसाठी तातडीने अर्ज करावेत, असा संदेश सोशल मीडियावर झळकत आहे. या सोबत एक लिंकही (एचटीटीपी://मोदी-लैपटॉप डॉट सरकारी-योजना डॉट इन/हॅशटैग) देण्यात आली आहे. लिंकवर जाताच पेज समोर येते. तेथे सर्वांत वर पंतप्रधानांच्या फोटोसोबत ‘मेक इन इंडिया’ लोगोही आहे. अर्जाच्या खाली नाव, मोबाईल नंबर, वय, राज्य आदी माहिती विचारली जाते.