यूपीत जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूवर बंदी, फॉर्मेल्डिहाइड आढळल्याने झाली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:11 AM2019-05-09T08:11:45+5:302019-05-09T08:12:27+5:30
प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे
नवी दिल्ली - प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बुधवारी लखनऊ येथील सेंट्रल स्टोअरवर छापा टाकून जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या सात उत्पादनाचे नमुनेही घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनाची चौकशी सुरु आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयपुरच्या जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पू उत्पादनाचे नमुने घेण्यात आले, त्यात हानिकारक असलेले रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळून आले. जयपुरमधील ही फॅक्टरी लखनऊ येथील स्टोअरमध्ये शॅम्पू सप्लाय करते. लखनऊ येथे तपासादरम्यान 100 मिलीलीटरचे 16 हजार 704 शॅम्पू पाकीटं जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच तपास यंत्रणेने सेंट्रल स्टोअरमधून शॅम्पू, बेबी ऑईल, मसाज ऑईल, फेस स्क्रीम यांचे सात नमुनेही घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
फॉर्मेल्डिहाइड किती नुकसानकारक?
एफएसडीएचे सहाय्यक आयुक्त रमाशंकर यांच्या माहितीनुसार फॉर्मेल्डिहाइडमुळे शरीरावर त्वचेशी निगडीत रोग होतात. तसेच कॅन्सरचा धोकाही उद्भावण्याची शक्यता आहे. याचा वापर खाद्यामध्ये व शरीराची संबंधित उत्पादनावर करण्यासाठी बंदी आहे. शॅम्पूमध्ये हे मिसळल्यामुळे घाम येत नाही. शरीरावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
एफएसडीएकडून 29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनावर बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 7 मे रोजी बंदी असलेली उत्पादने कंपनीला परत घेण्याचे आदेश दिलेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना करण्यात आल्या आहेत.
मागच्या वर्षीदेखील जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या अॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिले होते. वैयक्तिक आरोग्यासाठी वापरलेल्या कंपनीच्या पावडरमुळे आपणास गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे महिलांनी आरोप केला होता.