सीव्हीत खोटी माहिती देताय? मग लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 01:03 PM2018-05-06T13:03:13+5:302018-05-06T13:03:13+5:30
अनेक कंपन्या मुलाखतीनंतर लाय डिटेक्टर टेस्ट करु लागल्या आहेत
हैदराबाद: जर तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये (CV) खोटी माहिती देत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही करत असलेली ही लबाडी पकडली जाऊ शकते. मुलाखतीसाठी येणारे उमेदवार खोटे बोलत असल्यानं, त्यांच्या सीव्हीमध्ये चुकीची माहिती देत असल्यानं अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आता लाय डिटेक्टर टेस्टचा वापर करण्यास सुरू केलीय. याशिवाय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठीही कंपन्यांकडून या टेस्टचा आधार घेतला जातोय. कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे अपहार आणि बाहेर फोडली जाणारी संवेदनशील माहिती यांचा शोध घेण्यासाठीही कंपन्या लाय डिटेक्टर टेस्ट करु लागल्या आहेत.
हैदराबाद शहरातील ट्रूथ लॅबमध्ये दरवर्षी 20 ते 30 कर्मचाऱ्यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट होतात. कर्मचाऱ्यांच्या परवानगीनंतरच या टेस्ट केल्या जातात. 'शहरातील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेदरम्यान लाय डिटेक्टर टेस्ट करतात. सध्या हे प्रमाण वाढू लागलंय. अनेक युरोपियन कंपन्यांमध्ये लाय डिटेक्टर टेस्ट अनिवार्य आहे. त्याशिवाय भरती प्रक्रिया पूर्णच होत नाही,' अशी माहिती ट्रूथ लॅब्सचे संचालक जीव्हीएचव्ही प्रसाद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी देशभरातून तज्ज्ञ व्यक्ती येत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. 'या टेस्टमध्ये हृदयाचे ठोके, नाडी आणि रक्तदाब तपासला जातो. यासोबतच तीन प्रश्नदेखील विचारले जातात. यामध्ये नियंत्रित, विषयाशी संबंध असलेल्या आणि नसलेल्या प्रश्नांचा समावेश असतो. टेस्टसाठी आलेल्या व्यक्तीला या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही, या दोन पर्यायांमध्ये द्यायची असतात. यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांची तपासणी केली जाते,' अशी माहिती प्रसाद यांनी दिली. या लॅबमध्ये केवळ कंपन्यांशी संबंधित लाय डिटेक्टर टेस्ट केल्या जातात. विवाहबाह्य संबंध यासारख्या घरगुती समस्यांसाठी याठिकाणी टेस्ट केली जात नाही. इथे होणाऱ्या प्रत्येक टेस्टसाठी 5 ते 10 हजार रुपये आकारले जातात.