देशात विमानाचे इंधन डिझेलपेक्षाही स्वस्त; दर ७२.२२ रुपये प्रति लीटर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:52 AM2018-10-12T01:52:39+5:302018-10-12T01:53:50+5:30
केंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे.
मुंबई : केंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे. पेट्रोलसाठी ८८ आणि डिझेलसाठी ७९ रुपये प्रति लीटर मोजावे लागत असताना विमानाचे इंधन मात्र ७२.२२ रुपये प्रति लीटर झाले आहे.
विमानाच्या इंधनावर केंद्र सरकार आतापर्यंत १४ टक्के उत्पादक शुल्क आकारत होते. ते आता ११ टक्के केले आहे. यामुळे इंधन स्वस्त झाले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने विमानाचे इंधन चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१८ यादरम्यान विमानाचे इंधन ५८.६० टक्क्यांनी महाग झाले. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान त्यात ९.५० टक्के वाढ झाली. निर्यातीपेक्षा आयात वाढल्याने देशाची चालू खात्यातील तूट वाढत होती.
ही तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यातच विमान इंधनाच्या आयातीवर ५ टक्के शुल्क लावले होते. त्यातून वाढलेले दर कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने विमानाच्या इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे.
प्रवाशांचा होणार फायदा?
हे इंधन स्वस्त झाल्याचा गुरुवारी हवाई क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. दिवसभर बाजारात मोठी घसरण झाली. बहुतांश कंपन्यांचे समभाग कोसळले असले तरी विमान कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास २ टक्के वाढ झाली.
इंधन स्वस्त झाल्याने तिकीट दर कमी होतील, त्यातून प्रवासी वाढतील व कंपन्यांना फायदा होईल, या आशेने गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.