लोकसभा निवडणुकीआधी इंधन स्वस्ताई; मोदी सरकारला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:32 AM2018-11-27T06:32:31+5:302018-11-27T06:32:40+5:30
सौदी अरेबियाकडून होणारा इंधनाचा पुरवठा सध्यापेक्षाही वाढणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी इंधनाचे दर मोदी सरकारच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाकडून होणारा इंधनाचा पुरवठा सध्यापेक्षाही वाढणार आहे. पुरवठा वाढला की दर घसरतील व त्यातून सरकारल दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.
अमेरिकेच्या सूचनेवर सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन वाढवले. सौदीतील कच्च्या तेलाचे उत्पादन मागील आठवड्यात प्रति दिवस १ कोटी १० लाख टन या उच्चांकावर गेले. कच्च्या तेलाच्या या अधिक उत्पादनामुळे १८ आॅक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान देशांतर्गत इंधनाचे दर सरासरी ८ ते १० रुपये प्रति लिटरने कमी झाले आहेत.
सौदी अरेबिया २०१९ मध्येसुद्धा कच्च्या तेलाचे अधिक उत्पादन करणार आहे. त्यातून भारताला या तेलाचा दमदार पुरवठा होऊन देशांतर्गत इंधनाचे दर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी कमी होतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.