एक दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:43 AM2018-09-20T08:43:16+5:302018-09-20T09:04:51+5:30
एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलची दरवाढ सुरुच आहे. मुंबईत गुरुवारी पेट्रोल 6 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अधिकच वाढ होत आहे. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनेक ठिकाणी नव्वदी गाठली असताना बुधवारी (19 सप्टेंबर) हे दर वाढलेच नाहीत. मात्र आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलची दरवाढ सुरुच आहे. मुंबईत गुरुवारी (20 सप्टेंबर) पेट्रोल 6 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 89.60 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.42 झाला आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे.
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.22 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.82.22 per litre & Rs.73.87 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.89.60 per litre & Rs.78.42 per litre, respectively. pic.twitter.com/nEIuPo2sAr
— ANI (@ANI) September 20, 2018
मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी अद्याप नव्वदी गाठलेली नसली तरीही राज्यात बऱ्याच ठिकाणी दरांनी नव्वदी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच अमेरिकेचे इराणशी संबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहे. तसेच केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवले आहे. यामुळे राज्यांकडून व्हॅटही लावला जात आहे. शिवाय अधिभारही असल्याने इंधनाचे दर आशियात आपल्याकडे सर्वाधिक आहेत.