आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर; आठ दिवसांत पाच रुपयांनी वाढले दर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:02 AM2022-03-30T07:02:40+5:302022-03-30T07:03:18+5:30
अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार; सामान्यांवर मोठा भार
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आठ दिवसामध्ये सातवेळा वाढ झाल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ४.८० रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८० पैसे तर डिझेलमध्ये ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती राज्यानुसार बदलतात.
सरकारने कमावले ३.३१ लाख कोटी
केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत.
निवडणुका होताच दरवाढीचा सपाटा
सातवेळा किमतीत वाढ : पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे विक्रमी १३७ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर, २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सातवेळा किमतीत वाढ करण्यात आली आहे.
वाढता वाढता वाढे...
मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहेत. बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत पेट्रोल पुन्हा एकदा ११५.०४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून, डिझेलच्या किमतीला शतक पूर्ण करण्यासाठी अवघे ७५ पैशांची वाढ होणे बाकी आहे.
सात दिवसांत
अशी झाली वाढ
(पैशांमध्ये)
पेट्रोल डिझेल
२२ मार्च ८० ८०
२३ मार्च ८० ८०
२५ मार्च ८० ८०
२६ मार्च ८० ८०
२७ मार्च ५० ५५
२८ मार्च ३० ३५
२९ मार्च ८० ७०
प्रमुख शहरातील दर
(प्रति लिटर रू.)
पेट्रोल डिझेल
परभणी ११८.९ १००.७२
नागपूर ११४.९६ ९७.७३
पुणे ११४.७१ ९७.४६
नांदेड ११७.४९ १००.१५
नाशिक ११५.३९ ९८.१२
औरंगाबाद ११५.६९ ९८.४०