टोलनाक्यांवर इंधन, वेळेपोटी वाया जातात १२ हजार कोटी, आयआयटीचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 02:06 AM2019-11-30T02:06:09+5:302019-11-30T02:06:29+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात.
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. १ डिसेंबरपासून टोल वसुलीसाठी वापरण्यात येणार असलेल्या फास्टॅग सुविधेमुळे ही हानी टळू शकणार आहे.
आयआयटी-कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘ब्लूआय टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील ४८८ टोलनाक्यांपैकी बहुतांश टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना खूप प्रतीक्षा करावी लागते. १८८ नाक्यांवरील सरासरी प्रतीक्षा कालावधी ५ ते १० मिनिटांचा आहे. ३२ टोलनाक्यांवर हा काळ तब्बल १० ते २० मिनिटांचा आहे.
‘बूलआय टेक्नॉलॉजी’च्या अहवालानुसार, टोलनाक्यांवर वाया जाणाऱ्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३५ टक्के नुकसान अकारण जळणाºया इंधनामुळे होते. मनुष्य तास वाया गेल्यामुळे होणारे नुकसान ५४ ते ५५ टक्के आहे.
सूत्रांनी सांगितले की, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गेल्या वर्षी तीन महिने आपल्या ५० टोलनाक्यांवरील तंत्रज्ञानाद्वारे मूल्यांकन केले. नुकसानीसंबंधीची ९० टक्के माहिती खरी असल्याचे त्यात आढळून आले. प्राधिकरणाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या दाव्यांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही टोलनाक्यांवरील अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. फोटोही तपासले. दाव्यातील माहिती योग्य असल्याचे त्यात आढळून आले.
फास्टॅगला चांगला प्रतिसाद
प्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, आतापर्यंत ७२ हजार फास्टॅग विकले गेले आहेत. मागील तीन दिवसांत दररोजच्या फास्टॅग विक्रीचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात मात्र, स्टार्टअपच्या प्रतिनिधींकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.