शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 04:07 PM2018-02-17T16:07:52+5:302018-02-17T17:27:08+5:30

छिंदमला तुरूंगात मारहाण झाल्याचीही चर्चा आहे.

Fugitive Shripad Chinddam from Maharashtra demand by MP Sambhaji Raje | शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

Next

दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारा  भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रासह दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह असताना अशा पद्धतीचे वक्तव्य सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर करतात. तुम्ही आता भाजपचे सहयोगी खासदार आहात, तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.त्यावेळी संभाजीराजेंनी म्हटले की, माझ्यासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे. असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीने खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तत्पूर्वी श्रीपाद छिंदमला शनिवारी सकाळी 9 वाजता अहमदनगरच्या सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नसला तरी सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे पत्र न्यायालयाला दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छिंदम याला सबजेलमधून हलवावे, असे पत्र सबजेल प्रशासनाने न्यायालयाला दिले आहे. निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलीसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता छिंदमला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला १ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ के़ एम़ कोठुळे यांनी छिंदमच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी छिंदम याच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी कोणी वकिल नव्हता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान छिंदम याला सबजेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे छिंदमला कैद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छिंदम याची लवकरच नगर बाहेर रवानगी होणार असल्याचे समजते.

Web Title: Fugitive Shripad Chinddam from Maharashtra demand by MP Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.