लडाखवासीयांची इच्छा पूर्ण; परंतु कारगिलला लेहपासून व्हायचे आहे वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:00 AM2019-08-06T04:00:57+5:302019-08-06T04:01:39+5:30

केंद्र सरकारच्या निर्णयाने लडाखवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण

Fulfilled the wishes of Ladakhis; But Kargil wants to be different from Leh | लडाखवासीयांची इच्छा पूर्ण; परंतु कारगिलला लेहपासून व्हायचे आहे वेगळे

लडाखवासीयांची इच्छा पूर्ण; परंतु कारगिलला लेहपासून व्हायचे आहे वेगळे

Next

- सुरेश डुग्गर 

जम्मू : लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने लडाखवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी अनेक वर्षे ज्या मागणीसाठी आंदोलने केली, ती मागणी आता पूर्ण झाली आहे. परंतु हा आनंद केवळ लेहच्या लोकांनाच आहे. कारगिलचे लोक तर लेहपासून वेगळे होऊ इच्छित आहेत. लडाखमध्ये लेह व कारगिल हे दोन जिल्हे आहेत.

लडाखला काश्मीरपासून वेगळे करावे व स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी १९४७ पासून जोरकसपणे केली जात होती. आता भाजपने ही मागणी पूर्ण करून आपले वचन पूर्ण केले आहे. १९८९मध्ये लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने आपल्या स्थापनेच्या वेळीच एकजूट होऊन यासाठी आंदोलन छेडले होते. केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीवर लेह व कारगिल जिल्ह्यांतील राजकीय पक्षांबरोबर लोकही एकजूटपणे उभे राहिले होते. २००२मध्ये लडाख युनियन टेरीटरी फ्रंटच्या स्थापनेनंतर या मागणीवरून राजकारण तापले होते. २००५मध्ये फ्रंटने लेह हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या २६ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर लडाखने या मागणीबाबत कधीच मागे वळून पाहिले नाही. या मुद्द्यावर २००४, २०१४ व २०१९मध्ये लडाखने खासदार जिंकून देऊन दिल्लीत पाठवले होते. २००४मध्ये फ्रंटचे उमेदवार थुप्स्तन छेवांग खासदार झाले होते. त्यानंतर ते २०१४मध्ये भाजप उमेदवाराच्या स्वरूपात लडाखहून पुन्हा खासदार झाले होते. आता २०१९मध्ये फं्रटची मागणी घेऊन भाजपचे उमेदवार जामियांग त्सीरिंग नांग्याल खासदार झाले आहेत.

असा आहे नवीन केंद्रशासित प्रदेश लडाख
लडाख एक उंच पठार आहे. त्याचा बहुतांश भाग ३,५०० मीटर (९,८०० फूट) उंच आहे. हा भाग हिमालय, कराकोरम पर्वतराजी व सिंधू नदीच्या वरील खोऱ्यात पसरलेला आहे. सुमारे ३३,५५४ वर्गमैलमध्ये पसरलेल्या लडाखमध्ये वास्तव्य करण्यासारखी जागा खूपच कमी आहे. येथे सर्वत्र उंच-उंच विशालकाय दगडाचे पर्वत व मैदाने आहेत. येथील सर्व धर्मांच्या लोकांची संख्या एकूण २,३६,५३९ आहे.

लडाख हा मूळ रूपाने एका मोठ्या तलावाचा बुडाचा भाग आहे, असे मानले जाते. अनेक वर्षांच्या भौगोलिक उलथापालथीनंतर हा भाग लडाख खोरे बनला. १८व्या शतकामध्ये लडाख व बाल्टिस्तानचा जम्मू-काश्मीरमध्ये समावेश करण्यात आला.

लडाखच्या पूर्व भागात लेहच्या परिसरात मुख्यत: असलेल्या रहिवाशांमध्ये तिबेटी, बौद्ध व भारतीय हिंदू आहेत. लडाखच्या पश्चिम भागात कारगिलच्या परिसरातील लोकसंख्या मुख्यत: भारतीय शिया मुस्लिमांची आहे. तिबेटवरील कब्जाच्या काळात अनेक तिबेटी येथे वास्तव्यास आले. चीनचा असा दावा आहे की, लडाख हा तिबेटचा भाग आहे. सिंधू नदी लडाखहून निघून पाकिस्तानच्या कराचीपर्यंत वाहते. प्राचीनकाळी लडाख हे अनेक महत्त्वाच्या व्यापारी रस्त्यांचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे.

लडाख एकेकाळी मध्य आशियाच्या व्यावसायिक उलाढालींचा बालेकिल्ला होता. सिल्क रूटची
एक शाखा लडाखमधून जात होती. इतर देशांतून शेकडो उंट, घोडे, खेचर, रेशीम व गालिचे येथे आणले जात होते तर भारतातून येथे रंग, मसाल्यांची विक्री केली जात होती. तिबेटहून याकवर लोकर, पश्मीना आदी घेऊन लोक लेहपर्यंत येत होते. येथून काश्मीरपर्यंत आणून खास प्रकारच्या शाल तयार केल्या जात होत्या.

थुप्स्तन छेवांग विजयाचे खरे शिल्पकार
लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या मुद्द्यावर दोन वेळा खासदार झालेले थुप्स्तन छेवांग हे लडाखच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. मागील ४० वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशाच्या मागणीसाठी अनेक घडामोडी करणाºया छेवांग यांनी १९८९मध्ये लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे नेतृत्व केले. त्यांनी २००२मध्ये लडाख युनियन टेरीटरी फ्रंट तयार करण्यातही मोठी भूमिका निभावली होती.

लडाख केंद्रशासित प्रदेशाची मागणी पूर्ण करण्यासाठी फं्रटने भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये गेल्यानंतरही २०१४मध्ये खासदाराच्या भूमिकेतून छेवांग यांनी आपल्या मागणीसाठी भाजपवर सतत दबाव निर्माण केला. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्ये आपली मागणी पूर्ण होत नाही, असे पाहून त्यांनी याचा निषेध करण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यांची कितीही मनधरणी केली तरी ते २०१९मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिलेच नाहीत.

आता लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाने आनंदित झालेल्या छेवांग यांनी सांगितले की, आमच्या प्रदेशाची एक खूप जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. भाजपने आपला वायदा पूर्ण केला आहे. लडाखमध्ये आज कोणालाही याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती की, त्यांची एवढी ७० वर्षांपासूनची मागणी एका फटक्यात पूर्ण होऊन जाईल. लडाखच्या लोकांना या विजयाचे श्रेय आहे. कारण त्यांनी एकजूट होऊन आंदोलन चालवले व या निर्णायक वेळेपर्यंत आणून सोडले.

Web Title: Fulfilled the wishes of Ladakhis; But Kargil wants to be different from Leh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ladakhलडाख