दुहेरी नेतृत्वाचा पूर्णपणे लाभ
By Admin | Published: September 9, 2015 03:57 AM2015-09-09T03:57:30+5:302015-09-09T03:57:30+5:30
अनुभवाच्या आधारे सोनिया गांधी आणि युवा शक्तीच्या आधारे राहुल गांधी यांच्या दुहेरी नेतृत्वाचा काँग्रेस पूर्णपणे लाभ घेत आहे. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद कधी सोपवायचे,
नवी दिल्ली : अनुभवाच्या आधारे सोनिया गांधी आणि युवा शक्तीच्या आधारे राहुल गांधी यांच्या दुहेरी नेतृत्वाचा काँग्रेस पूर्णपणे लाभ घेत आहे. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद कधी सोपवायचे, याबाबत पक्ष आवश्यकता भासेल तेव्हा निर्णय घेईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कार्यकारिणी बैठकीची माहिती देताना स्पष्ट केले.
काँग्रेसमधील ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणे अडचणीचे ठरले असते. त्यांनी वेळोवेळी त्याबाबत विरोधाचा सूर उठविला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी या मुद्यावर विस्तृत चर्चा करीत निर्णय घेतला. उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी विविध आंदोलनात पक्षाचा चेहरा म्हणून समोर येतील. पक्षात आणि बाहेर स्वीकारार्ह चेहरा म्हणून त्यांचा दावा मजबूत व्हावा, हा त्यामागचा उद्देश असेल.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कार्यकारिणीसंबंधी सर्व महत्त्वपूर्ण मुद्यांवर निर्णयाचा अधिकार राहील, असे सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, आर.के. धवन, पी. चिदंबरम यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी झाले. या बैठकीत देशाची आर्थिक स्थिती आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. भूसंपादन विधेयकावर २० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक रॅली आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी झाला. तत्पूर्वी, राहुल गांधी बिहारचा दौरा करणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटून प्रचाराला वेग देतील.
कार्यकाळ पाचऐवजी तीन वर्षांचा
सर्वाधिक काळ पक्षाध्यक्षपद सांभाळण्याचा विक्रम यापूर्वीच सोनिया गांधी यांच्या नावे जमा झाला आहे. त्यांनी १९९८ च्या प्रारंभी पक्षनेतृत्वाची धुरा स्वीकारली होती. डिसेंबर २०१० मध्ये बुरारी येथील अधिवेशनात पक्षाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात आला होता.
आता काँग्रेसने पक्षघटनेत बदल प्रस्तावित करताना यापुढे सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा केला असून, संघटनात्मक निवडणुका पार पाडणे बंधनकारक राहील.
काँग्रेस कार्यकारिणीने मंगळवारी पारित केलेल्या ठरावाला महाअधिवेशनात मान्यता दिल्यानंतर पक्षघटनेत बदल केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी एकच सदस्यत्व योजना आणली जाणार आहे. युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल किंवा महिला काँग्रेस या आघाड्यांमध्ये प्रवेश घेताच तो अ.भा. काँग्रेसमध्ये प्रवेश मानला जाईल. किमान २५ सदस्य जोडणाऱ्या कार्यकर्त्याला सक्रिय सदस्य मानले जाईल. अंतर्गत निवडणुकीत त्यांच्या शब्दाला किंमत असेल.