आजी-माजी पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीवर पूर्णपीठ करील सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:16 AM2020-03-05T06:16:16+5:302020-03-05T06:16:41+5:30
पूर्ण पीठाने तक्रार फेटाळल्यास चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही किंवा कोणालाही दिली जाणार नाहीत, असे लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासंबंधी अधिसूचित नवीन नियमात म्हटले आहे.
नवी दिल्ली : विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध दाखल तक्रारीवर लोकपालांचे पूर्ण पीठ बंद कक्षात सुनावणी घेईल. पूर्ण पीठाने तक्रार फेटाळल्यास चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही किंवा कोणालाही दिली जाणार नाहीत, असे लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासंबंधी अधिसूचित नवीन नियमात म्हटले आहे. लोकपाल संस्था स्थापन करण्यात आल्यानंतर सरकारने तब्बल वर्षभरानंतर तक्रार दाखल करण्यासंबंधीने नियम अधिसूचित केले आहेत. २ मार्च २०२० रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अधिसूचित केलेल्या लोकपाल (तक्रार) नियमांत विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांबाबत कशी कार्यवाही करायची, याचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. या नियमांनुसार तक्रारदाराने विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध तक्रार दाखल केल्यास त्यावर लोकपालांचे पूर्णपीठ (अध्यक्ष आणि सर्व सदस्य) तक्रारीबाबत चौकशी सुरूकरता येऊ शकते की नाही, यावर विचार करील. लोकपालांचे किमान दोनतृतीयांश सदस्यांचे पीठ तक्रारीबाबत चौकशी करायची की नाही, याचा निर्णय घेईल.
>अशा तक्रारी फेटाळल्या जातील : नियमात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकपाल कोणत्या आधारे तक्रार फेटाळू शकते. खोटी, वा आकसबुद्धीने केलेली किंवा क्षुल्लक असल्यास तसेच तक्रारीत लोकसेवकांविरुद्ध आरोप स्पष्ट नसल्यास लोकपाल तक्रार फेटाळू शकते. अन्य न्यायायल, न्यायाधिकारी किंवा प्राधिकरणाकडे तक्रार प्रलंबित आहे किंवा कथित गुन्हा सात वर्षांच्या अवधीत नसल्यास अशा तक्रारी लोकपाल फेटाळू शकते.