‘नेट निरपेक्षते’ला संपूर्ण पाठिंबा -झुकेरबर्ग

By admin | Published: October 28, 2015 09:59 PM2015-10-28T21:59:06+5:302015-10-28T21:59:06+5:30

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताशी स्वत:ला जोडून घेतल्याशिवाय जगाशी ‘कनेक्ट’ होताच येणार नाही, अशी मनमोकळी ‘कबुली’ देत भारत दौऱ्यावर आलेला

Full support for 'Net Absolute' - Zuckerberg | ‘नेट निरपेक्षते’ला संपूर्ण पाठिंबा -झुकेरबर्ग

‘नेट निरपेक्षते’ला संपूर्ण पाठिंबा -झुकेरबर्ग

Next

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताशी स्वत:ला जोडून घेतल्याशिवाय जगाशी ‘कनेक्ट’ होताच येणार नाही, अशी मनमोकळी ‘कबुली’ देत भारत दौऱ्यावर आलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने बुधवारी नेट न्युट्रॅलिटीच्या मागणीला इंटरनेट डॉट ओआरजीचा १०० टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले.
जगातील अब्जावधी लोकांकडे अद्यापही इंटरनेट नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार सहानुभूती आहे. त्यांना इंटरनेटच्या परिघात आणण्यासाठी फेसबुकचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असले तरी संपूर्ण इंटरनेट मोफत देताच येणार नाही. सर्व नेट पुरवठादारांनी त्यांच्या नेटवर्कवरून होणाऱ्या इंटरनेट सुविधेचे दळणवळण समप्रमाणात करण्याच्या म्हणजेच ‘नेट न्युट्रॅलिटी’च्या मागणीला इंटरनेट डॉट ओआरजीचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे झुकेरबर्ग यावेळी म्हणाला.
भारत दौऱ्यावर आगमन झालेल्या झुकेरबर्गने आयआयटी-दिल्लीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. नेट न्युट्रॅलिटीपासून कँडीक्रॅशची समस्या ते व्यावसायिक आयुष्यातील यश-अपयश अशा अनेक बाबींवर तो बोलला. झुकेरबर्गचा हा दुसरा भारत दौरा आहे. नेटवर्क, किंमत आणि जागरुकता या तिन्ही गोष्टी इंटरनेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. जगातील चार अब्ज लोकांपर्यंत अद्यापही इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यामुळे ते अनेक संधींपासून दूर आहेत. या सर्वांबाबत माझ्या मनात सहानुभूती आहेत. यावर उपाययोजना शोधण्याचे आमचे प्रयत्न आहे. सध्या ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा आहे, तेच नेट न्युट्रॅलिटीबाबत बोलत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधाच नाही, त्यांचा विचार करणे आपले नैतिक कर्तव्य आहे. केवळ इंटरनेट नाही म्हणून ते संधींपासून वंचित राहायला नको. पण असे असले तरी संपूर्णपणे मोफत इंटरनेट देता येणार नाहीच. अशास्थितीत ज्या प्राथमिक सुविधा आहेत, त्या सर्वांसाठी उपलब्ध असाव्यात, असे माझे मत आहे, असे झुकेरबर्ग म्हणाला. फेसबुकचा इंटरनेट डॉट ओआरजीचा हेतू विकसनशील देशांत इंटरनेट पोहोचवणे हा आहे. मात्र असे असूनही कंपनीला याबद्दल चहुबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागते आहे. इंटरनेट डॉट ओआरजी व फेसबुकचा नेट न्युट्रॅलिटीला पूर्णपणे पाठिंबा आहे.
इंटरनेट डॉट ओआरजी २४ पेक्षा अधिक देशांमध्ये लाईव्ह आहे आणि १.५ कोटी लोक इंटरनेट डॉट ओआरजीसोबत थेटपणे संबंधित आहे. ही संख्या मोठी आहे. भारतातीलही १० लाख लोक इंटरनेट डॉट ओआरजीच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडले गेले आहेत.
काय आहे इंटरनेट डॉट ओआरजी
इंटरनेट डॉट ओआरजी हा फेसबुकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तथापि या प्रकल्पाला जगभरातून विरोध होत आहे. जगातील विकसनशील देशांतील नागरिकांना निवडक इंटरनेट सेवा विनामूल्य उपलब्ध करून देणे, अशी ही योजना आहे. या प्रकल्पासाठी फेसबुकने जगभरातील सात मोबाईल कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या प्रकल्पाद्वारे विनामूल्य इंटरनेट पुरविण्याचा दावा फेसबुक करीत असले तरी प्रत्यक्षात इंटरनेटवरील केवळ अतिसूक्ष्म भागच याद्वारे उपलब्ध केला जातो, असा आरोप आहे. या योजनेअंतर्गत विशिष्ट सेवाच विनामूल्य पुरविल्या जात असल्याने यामुळे ‘नेट न्युट्रॅलिटीचा’ भंग होत असल्याचाही आरोप होत आहे.
चुका कराच
चुका न करता कुणीही काहीही शिकू शकत नाही. तेव्हा चुका कराच. कारण चुकांमधूनच माणूस घडतो. मीही अनेक चुका केल्या. केवळ मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहावे, यातून फेसबुकच्या कल्पनेचा जन्म झाला. पण ही कल्पना एक कंपनी उभी करेल आणि ती कंपनी जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट असेल, असे वाटले नव्हते. पण अपार प्रयत्न केले. यादरम्यान चुकाही केल्या आणि यश मिळवले, असा एक कानमंत्रही झुकेरबर्ग याने दिला.
कँडीक्रश समस्येवर लवकरच तोडगा शोधू
फेसबुकवर सतत येणाऱ्या कँडीक्रश सागा गेमच्या रिक्वेस्टमुळे फेसबुक युजर्स त्रस्त आहेत. भारत दौऱ्यावर आलेल्या झुकेरबर्गला त्यामुळेच याबाबतच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. अतिशय इरिटेटिंग असलेल्या या रिक्वेस्ट कशा थांबवाव्यात, अशा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर सभागृहात जोरदार हंशा पिकला. मात्र फेसबुक टीमचे यावर काम सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल, असे सांगून झुकेरबर्गने सर्वांचे समाधान केले. कँडीक्रॅश हा गेम आहे. फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय असलेला हा गेम खेळणारे अन्य युजर्सला गेम खेळण्याचे निमंत्रण अर्थात रिक्वेस्ट पाठवतात. त्यामुळे इतरांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा अमेरिकेपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारतात फेसबुकचे १३ कोटी युजर्स आहेत. जगात फेसबुकचे १.३ अब्ज युजर्स आहेत.

Web Title: Full support for 'Net Absolute' - Zuckerberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.