ह्दयद्रावक! एकाच चितेवर आर्मी जवान अन् त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार; गावकऱ्यांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:43 AM2021-06-10T09:43:31+5:302021-06-10T09:44:53+5:30
आर्मी जवान आणि त्याच्या कुटुंबाचा मृतदेह आर्मी कँम्पमध्ये आणण्यात आला होता. याठिकाणी सैन्याने पुष्पचक्र अर्पित करून दोन मिनिटं श्रद्धांजली वाहिली.
गया – रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर सोमवारी डिहा गावात राहणाऱ्या आर्मी जवान पिंटू सिंह आणि त्यांच्या पत्नी काजल आणि मुलगा रेहान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गयाच्या विष्णूपद येथे स्मशान घाटावर आर्मी जवान आणि त्यांच्या पत्नी काजल यांच्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाच्या डोळ्यांमधून पाणी आले.
त्याआधी आर्मी जवान आणि त्याच्या कुटुंबाचा मृतदेह आर्मी कँम्पमध्ये आणण्यात आला होता. याठिकाणी सैन्याने पुष्पचक्र अर्पित करून दोन मिनिटं श्रद्धांजली वाहिली. आर्मी जवान त्याच्या कुटुंबासह नव्या घरात गृह प्रवेश करण्यासाठी मथुरा कँटपासून गयाच्या गुरारू येथे जाण्यासाठी निघाले होते. रविवारी संध्याकाळी कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती परिसरात जीटी रोडवर त्यांचा अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक पटलून तो आर्मी जवानाच्या कारवर पडला होता.
ज्यात जागीच आर्मी जवानासह त्याचे कुटुंब ठार झालं. मृत्यूमध्ये आर्मी जवान पिंटू सिंह, पत्नी काजल देवी, मुलगा रेहान यांचा समावेश आहे. घटनेत ८ वर्षाची मुलगी गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्मी जवानाचा भाऊ सूचित सिंहने सांगितले की, गुरारू डीहा गावात नव्या घरात गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. त्यासाठी सुट्टी घेऊन ते मथूरा आर्मी कॉटर येथून कारमधून डिहा गावाला निघाले होते. मात्र वाटेतच अपघातात त्यांचा जीव गेला. भाऊ आणि त्याच्या पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मुलगा रेहानचा मृतदेह दफन करण्यात आला आहे.