माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 03:19 PM2019-08-25T15:19:11+5:302019-08-25T15:34:55+5:30
देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी दिल्ली - देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटलींचा मुलगा रोहन यांने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंजत असलेल्या अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी निधन झाले होते.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून भाजपाच्या मुख्यालयात आणण्यात आले होते. तेथे भाजपाच्या अनेक नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे प्रदीर्घ आजारानंतर शनिवारी दुपारी येथे निधन झाले होते. स्वपक्षीयांप्रमाणेच विरोधी पक्षातील नेत्यांशीही स्नेहाचे संबंध असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावल्याची हळहळ संपूर्ण देशात व्यक्त केली गेली. सुषमा स्वराज यांच्यानंतर पंधरा दिवसांत जेटलींच्या रूपाने दुसरा दिग्गज नेता हरपल्याने भाजपची फार मोठी हानी झाली. कित्येक दशकांचे घनिष्ट संबंध असलेला अनमोल मित्र हरपल्याचे दु:ख व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जणू लाखो देशवासीयांच्या शोकभावनाच शब्दांकित केल्या.दिल्ली के निगमबोध घाट पर अरुण जेटली का पार्थिव शरीर पंचतत्व में विलीन हुआ. pic.twitter.com/oJ02KUlmk0
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) August 25, 2019
Delhi: Former Union Minister and BJP leader, #ArunJaitley cremated with full state honours at Nigambodh Ghat, today. pic.twitter.com/Nj2THkdnPv
— ANI (@ANI) August 25, 2019
अरुण जेटली ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता, विवाहित कन्या सोनाली जेटली-बक्षी व पुत्र रोहन असा परिवार आहे. जेटलींच्या निधनाचे वृत्त कळताच मोदी यांनी फोन करून जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बरेच दिवस प्रकृती नाजूक असलेल्या जेटली यांना ९ आॅगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले होते. तेव्हापासून जेटली अतिदक्षता विभागात होते व वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.
गेले काही दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणांवर (लाइफ सपोर्ट) ठेवण्यात आले होते. हळूहळू एकेक अवयव निकामी होत त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली व त्यातच दु. १२.०७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.