गौरी लंकेश यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार, राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 08:51 PM2017-09-06T20:51:23+5:302017-09-06T20:55:03+5:30

भ्याड हल्ला करून  हत्या करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी बंगळुरूमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Funeral for Gauri Lankesh, presence of many social workers including political leaders | गौरी लंकेश यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार, राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

गौरी लंकेश यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार, राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

Next

बंगळुरू, दि. ६ - भ्याड हल्ला करून  हत्या करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी बंगळुरूमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. गंभीर वातावरणात उपस्थितांनी गौरी लंकेश अमर रहे अशा घोषणात देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी त्यांना बंदुकांमधून गोळ्यांच्या फैरी झाडत त्यांना सलामी दिली. 
 गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय नेत्यांसोबत कन्नड फिल्म जगतातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी गौरी यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला शोक अनावर झाला होता.  मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गौरी लंकेश यांची हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती.  
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेक-यांना पकडण्याचं मोठं आव्हान कर्नाटक पोलिसांसमोर आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. सावधगिरी म्हणून सर्व महत्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करणा-या सर्व टोलनाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून शहरात येणा-या आणि शहरातून जाणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.  
'मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व चेकपोस्टवर लोक आणि वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. आंतरराज्यीय सीमांवरही आमचं लक्ष आहे', अशी माहिती पोलीस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली आहे. 'आम्ही शेजारी राज्य आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूलाही यासंबंधी अलर्ट दिला आहे', असं एम एन अनुचेत यांनी सांगितलं आहे.  
पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असून एका सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली असून त्याच्यावर पोलिसांना संशय आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, तसंच अंगावर काळे कपडे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी परिसरातील मोबाईल टॉवरचीही तपासणी सुरु केली. तीन मोबाईल टॉवरची तपासणी सुरु असून त्यांचा डाटा गोळा केला जात आहे.   

Web Title: Funeral for Gauri Lankesh, presence of many social workers including political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.