शहीद जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By admin | Published: September 6, 2015 10:48 PM2015-09-06T22:48:57+5:302015-09-06T22:48:57+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे उडालेल्या सशस्त्र चकमकीत शहीद झालेला भारतीय लष्कराचा जवान लान्स नायक मोहननाथ गोास्वामी याच्यावर रविवारी हल्दवानी
हल्दवानी/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे उडालेल्या सशस्त्र चकमकीत शहीद झालेला भारतीय लष्कराचा जवान लान्स नायक मोहननाथ गोास्वामी याच्यावर रविवारी हल्दवानी या त्याच्या जन्मगावी हजारो साश्रूनयनांच्या साक्षीने लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद गोस्वामी याने मृत्यूला सामोरे जाण्याआधी १० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते.
गोस्वामीने ११ दिवसांत १० दहशतवाद्यांचा खात्मा करून हौतात्म्य पत्करले, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी सांगितले. मोहननाथने २००२ मध्ये लष्कराच्या एलिट पॅरा कमांडो दलात प्रवेश केला होता.
कमांडो या नात्याने त्याने लष्कराच्या सर्वच कठीण कारवायांमध्ये भाग घेतला होता. त्याने २३ आॅगस्ट रोजी खुरनार व हंदवाडा येथील मोहिमेत भाग घेऊन तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर २६ आणि २७ आॅगस्टला रफीयाबाद येथील मोहिमेत आणखी तीन दहशतवाद्यांना टिपले होते.
यावेळी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. मोहननाथ येथेच थांबला नाही आणि त्याने ३ सप्टेंबर रोजी कुपवाडाच्या हफ्रुदा येथील मोहिमेत भाग घेतला. पण ही मोहीम त्याच्यासाठी शेवटची मोहीम ठरली.
यावेळी मोहननाथ शहीद झाला. पण हौतात्म्य पत्करण्यापूर्वी त्याने चार दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती कर्नल गोस्वामी यांनी दिली. (वृत्तसंस्था)