शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींना समाधी, गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्याशेजारीच अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:08 AM2018-03-02T06:08:17+5:302018-03-02T06:08:17+5:30
कांची कामकोटी मठाचे ६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जयेंद्र सरस्वती यांचे गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या शेजारीच त्यांची समाधी असेल.
चेन्नई : कांची कामकोटी मठाचे ६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जयेंद्र सरस्वती यांचे गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या शेजारीच त्यांची समाधी असेल. जयेंद्र सरस्वती (८२) यांचे बुधवारी निधन झाले. कनिष्ठ पुजारी श्री विजयेंद्र सरस्वती यांनी अंत्यसंस्कार केले. अभिषेक, पूजा आणि आरती आदी विधींना सकाळी सात वाजता प्रारंभ झाला होता. बुधवारी संपूर्ण रात्रभर वेगवेगळ््या ठिकाणांहून आलेले भाविक शंकराचार्यांना आदरांजली अर्पण करीत होते. तथापि, बाहेरच्या लोकांना विधींमध्ये सहभागी होण्यास मुभा नव्हती. विधी झाल्यानंतर त्यांना समाधी दिली गेली. तमिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा आणि पी. राधाकृष्णन व इतर महत्वाच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली अर्पण केली व विधीच्या वेळी ही मंडळी उपस्थित होती. सकाळी मठाच्या अधिकाºयांनी लोकांना दर्शन मनाई केली व श्लोकांचे पठण सुरू केले. वृंदावनच्या स्थापनेची प्रक्रिया बघण्यास छोट्याशा सभागृहात मोठी गर्दी जमली होती.
यावेळी के. नजिमुद्दीन म्हणाले की, मी मठाला गेली २० वर्षे भेट देत आहे. जयेंद्र सरस्वती यांनी कधीही धार्मिक भेदभाव केला नाही. ते धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन द्यायचे, असे ते म्हणाले. फर्निचर बनवणारे ए. एस. नझीर म्हणाले की, मी आचार्यांसाठी बनवलेला सोफा काहीच दिवसांपूर्वी त्यांना दिला होता परंतु त्यांची माझी भेट न झाल्यामुळे सोफ्याबद्दलचे त्यांचे मत समजले नाही. इस्लामबद्दलची माहिती ते खूप उत्सुकतेने घेत.
>समाजसेवेचा गौरव
जयेंद्र सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धार्मिक, राजकीय विचारधारा बाजुला ठेवून शेकडो लोक रांगेत उभे होते.
आचार्यांच्या समाजसेवेचा गौरव त्यांनी केला. स्थानिक मुस्लिम रहिवाशांचा गट श्रद्धांजली वाहण्यास आला होता.
>६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.