जवान हनुमंतअप्पांवर अंत्यसंस्कार
By admin | Published: February 13, 2016 02:22 AM2016-02-13T02:22:18+5:302016-02-13T02:22:18+5:30
सियाचीनमध्ये ३० फूट बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही तब्बल नऊ दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज देणारे भारतीय लष्कराचे जिगरबाज जवान लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड यांना शुक्रवारी
धारवाड : सियाचीनमध्ये ३० फूट बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही तब्बल नऊ दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज देणारे भारतीय लष्कराचे जिगरबाज जवान लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड यांना शुक्रवारी हजारो साश्रूनयनांच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्णातील बेटादूर या गावी हनुमंतअप्पा यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्काराच्या वेळी हनुमंतअप्पा यांची पत्नी, आई आणि दोन वर्षांची कन्या उपस्थित होती. हनुमंतअप्पा यांच्या निधनामुळे बेटादूर गावावर शोककळा पसरली आहे. तत्पूर्वी गुरुवारी रात्री हनुमंतअप्पा यांचे पार्थिव हुबळीच्या किम्स रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथून ते नेहरू मैदानावर हलविण्यात आले, जेथे हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि अन्य नेत्यांनीही हनुमंतअप्पा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हनुमंतअप्पा यांचे पार्थिव बेटादूर येथे आणण्यात आले. ३३ वर्षीय हनुमंतअप्पा हे सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनानंतर अन्य नऊ जवानांसह ३० फूट बर्फात गाडले गेले होते. तेथे त्यांनी सहा दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. बचाव पथकाने त्यांना बाहेर काढले त्यावेळी ते जिवंत होते. त्यांना लगेच दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्यांना तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वीरमरण आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी हनुमंतप्पांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, कुटुंबीयांना भूखंड, पत्नीला सरकारी नोकरी व स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. (वृत्तसंस्था)
हनुमंतअप्पा कोप्पड यांच्यावर बेटादूर या त्यांच्या जन्मगावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ‘हनुमंतप्पा अमर रहे,’ ‘भारत माता की जय,’च्या निनादात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बेटादूर आणि आसपासच्या गावातील हजारो लोकांनी हनुमंतअप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली होती.