इमिग्रेशन प्रक्रिया आणखी गतिमान; अमित शाह यांच्या हस्ते 'एफटीआय-टीटीपी'चा प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 07:25 AM2024-06-23T07:25:34+5:302024-06-23T07:28:51+5:30
गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'एफटीआय-टीटीपी'चा प्रारंभ
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम'चा (एफटीआय-टीटीपी) शुभारंभ केला. या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक आणि विदेशातील भारतीय नागरिक (ओसीआय) कार्ड धारकांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया अधिक गतिमान केली जाणार आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, याचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे) द्यावे लागतील. एफटीआय नोंदणी जास्तीत जास्त ५ वर्षे किंवा पासपोर्टची वैधता यापैकी जे कमी असेल, तेवढी वर्षे वैध असेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक्स बंधनकारक असेल. अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी अर्जदारास आपला सध्याचा पत्ता द्यावा लागेल.
एफटीआय-टीटीपीचा उद्देश लोकांचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित करणे हा आहे. मोबाइल ओटीपी आणि ईमेल पडताळणीनंतर नोंदणी पूर्ण होईल, एफटीआय-टीटीपी हा कार्यक्रम अमेरिकेच्या 'ग्लोबल एंट्री प्रोग्राम' सारखा आहे. देशातील २१ प्रमुख विमानतळांवर तो राबविला जाईल. पहिल्या टप्प्यात ७ विमानतळावर तो सुरू होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, कोची आणि अहमदाबाद हे ते विमानतळ होते.