पांडवांचे इंद्रप्रस्थ दिल्लीतच होते याला आणखी बळकटी, उत्खननात सापडले २,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:32 AM2018-01-29T02:32:00+5:302018-01-29T02:34:41+5:30
महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत.
नवी दिल्ली : महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत.
‘पुराना किला’मधील ताज्या उत्खनतात रंगविलेल्या राखाडी मातीच्या भांड्याचे अवशेष मिळाले असून ते इसवी सनपूर्व ६०० ते १२०० वर्षांपूर्वीच्या लोहयुगात या भागात विकसित झालेल्या गंगेच्या पश्चिम पठारीय आणि घग्गर-हाक्रा खोºयातील संस्कृतीशी संबंधित असावेत, असे तज्ज्ञांना वाटते.
भारतीय पुरातत्व विभागातर्फे (एएसआय) करण्यात येत असलेल्या या ताज्या उत्खननाचे प्रकल्प संचालक वसंत स्वर्णकार यांनी यास दुजोरा देताना सांगितले की, आम्हीला रंगविलेल्या मातीच्या भांड्यांचे अवशेष आढळले आहेत. परंतु त्या कालखंडातील संस्कृतीविषयी ठाम निष्कर्ष काढण्यासाठी आणि काही मीटर खाली उत्खनन करावे लागेल. कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत ते काम पूर्ण होईल.
स्वर्णकार यांनी असेही सांगितले की, ताज्या उत्खननात आम्हाला मौर्य, शुंग, कुशाण, राजपूत व मुघल या सर्व कालखंडांशी संबंधित मातीची भांडी, मणी, मूर्ती आणि नाणीही सापडली आहेत.
सध्या सुरु असलेले उत्खनन हे चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे असून ते जमीनीच्या पृष्ठभागापासून ११ मीटर खोलीपर्यंत करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात आणखी दोन मीटर उत्खनन पूर्ण होईल व मातीच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचले जाईल. हे उत्खनन पूर्ण झाले की, दिल्लीच्या २,५०० वर्षांच्या विनाखंड संस्कृतीचे प्रतिक म्हणून या ठिकाणाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा ‘एएसआय’चा विचार आहे.
स्वर्णकार यांनी सांगितले की, उत्खननाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर हे स्थळ पारदर्शक छताने आच्छादले जाईल. त्यातून लोकांना आतील गोष्टी पाहता येतील.
सोबत जागेचा सविस्तर नकाशा व माहिती फलकही लावले जातील.
या ठिकाणाची इतिहासाच्या निरनिराळ््या कालखंडातील संगतवार माहिती अभ्यागतांना मिळावी
यासाठी माहिती केंद्रही स्थापन केले जाईल.
मौर्यकाळापूर्वीचे अवशेष
सध्या ‘पुराना किला’ म्हणून ओळखले जाणारे भग्नावशेष हा सूर साम्राज्याचा संस्थापक शेर शाह सुरी यांने सन १५४५ मध्ये मृत्यू होण्यापूर्वी बांधलेला किल्ला आहे, असे मानले जाते.
मात्र स्वर्णकार यांचे असे म्हणणे आहे की, येथील उत्खननातून आणि खास करून सन २०१३-१४ मध्ये करण्यात आलेल्या याआधीच्या उत्खननातून या ठिकाणच्या मानवी संस्कृतीचा कालखंड मौर्य कालखंडापूर्वीपासूनचा असावा असे दिसते.
यमुनेच्या काठी असल्याने हे ठिकाण सर्वच कालखंडांत व्यापारउदीम व शासकीय कारभाराचे प्रमुख केंद्र असावे, असा अंदाज यावरून करता येतो.
महाभारत काळाशी नाते
पुराना किला’मध्ये सन १९५४-५५ व १९६९-७२ या काळात उत्खननाचे दोन टप्पे हाती घेण्यात आले होते. त्यावेळचे ‘एएसआय’चे संचालक बी. बी. लाल यांनाही या ठिकाणी रंगविलेल्या मातीच्या भांड्यांचे अवशेष मिळाले होते.
लाल यांनी ‘महाभारता’मध्ये उल्लेख केलेल्या विविध स्थळांचे उत्खनन करण्याचे मिशन हाती घेतले व त्यावेळी त्यांनी ‘महाभारत’ काळाशी नाते सांगणारे असे सामायिक पुरातत्वीय पुरावे या सर्व ठिकाणी सापडल्याचा दावा त्यांनी केला होता.
त्यावेळी सापडलेल्या मातीच्या भांड्यांचा पुरातत्वीय कालखंड इसवी सन पूर्व सहाव्या ते १२ व्या शतकातील असावा,असा अंदाज केला गेला होता. त्याआधारे लाल यांनी असा दावा केला होता की, पांडवांची इंद्रप्रस्थ नगरी आजच्या ‘पुराना किला’च्या जागी होती व महाभारतील युद्ध इसवी सनाआधी ९०० वर्षांपूर्वी झाले होते.