बिहारचे भवितव्य 'तेजस्वी', भाजपाच्या 'शत्रूं'ची यादवी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:18 PM2018-10-17T15:18:48+5:302018-10-17T15:21:18+5:30
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपविरुद्ध मोहीम चालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला.
पाटणा - ज्येष्ठ अभिनेता आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाविरुद्ध रणशिंगच फुंकल्याचे दिसून येते. मंगळवारी शत्रुघ्न सिन्हा यांनी नवरात्रीनिमित्त पाटण्यातील अनेक देवींच्या मंडळांना भेटी दिल्या. त्यावेळी राजद नेते लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट सिन्हा यांनी घेतली. तसेच, तेजस्वी म्हणजे बिहारचे भवितव्य आहे, असे म्हणत बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांची ही कसली यादवी खेळी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपविरुद्ध मोहीम चालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला. त्यानंतर, सपाकडून मोदींविरोधात सिन्हा यांना वाराणसीची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चाही सुरू झाली. त्यानंतर, आता सिन्हा यांनी बिहारचे युवक नेते तेजस्वी यादव यांचे कौतूक केलं आहे. शत्रू यांनी पाटणा येथील कृष्णा नगरमध्ये तेजस्वी यादवसह देवीच्या आरतीला उपस्थिती लावली. तेजस्वी हे कणखर, हुशार आणि उच्चशिक्षित आहेत. तसेच सर्वच राजकीय पुढाऱ्यांचे लाडके आहेत. त्यामुळे बिहारचे भवितव्य मला तेजस्वीमध्ये दिसत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले. तर, अच्छे दिनाचे मला माहित नाही, पण लवकरच शुभ दिन येतील, असा दावाही सिन्हा यांनी केला. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे असे राजकीय नेते आहेत, जे नेहमीच यादव कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असतात, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले.