राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:51 PM2023-09-08T16:51:20+5:302023-09-08T16:52:53+5:30
G-20 Summit : G-20 परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे.
G-20 Summit : राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात येत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी राजधानीला छावणीचे स्वरुप आले आहे. जागोजागी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. काना कोपऱ्यात पोलीस आणि लष्कराचे जवान तळ ठोकून आहेत. दिल्लीतील अनेक भागात लॉकडाऊनसारखी परिस्थिती दिसून येत आहे.
DRDO कडे सुरक्षेची जबाबदारी
उद्यापासून G-20 परिषदेच्या बैठका सुरू होणार आहेत. यासाठी जो बायडेन, ऋषी सुनक आणि जस्टिन ट्रुडो यांच्यासह अनेक देशांचे नेते आज राजधानीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी डीआरडीओचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. डीआरडीओने अशी सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे, ज्याद्वारे कुठलाही हल्ला परतून लावता येऊ शकतो.
#WATCH | Delhi | Indian counter-drone system developed by the Defence Research and Development Organisation (DRDO) deployed in the diplomatic enclave in the national capital to provide protection against any possible drone threat. The drone systems of the DRDO & Indian Army along… pic.twitter.com/BCDBJMczs4
— ANI (@ANI) September 7, 2023
ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात
G20 साठी सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की, ड्रोनच्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून संरक्षणासाठी अँटी-ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विकसित केलेली भारतीय काउंटर ड्रोन यंत्रणा डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये तैनात करण्यात आली आहे. चोवीस तास सुरक्षा कडेकोट ठेवण्यासाठी, DRDO आणि भारतीय लष्कराची ड्रोन यंत्रणा हवाई धोक्यांना सामोरे जाण्यासाठी इतर संस्थांसोबत काम करत आहेत.