ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वोत्तम तेच करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली ठाम भूमिका; युएईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:21 AM2022-06-29T08:21:05+5:302022-06-29T08:21:52+5:30

जी-७ शिखर परिषदेच्या दोन्ही सत्रांत पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची स्थिती स्पष्ट केली.

G-7 summit will do the best for energy security; Prime Minister Narendra Modi played a strong role | ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वोत्तम तेच करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली ठाम भूमिका; युएईमध्ये दाखल

ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वोत्तम तेच करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली ठाम भूमिका; युएईमध्ये दाखल

Next

 

एल्माउ (जर्मनी) :  रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर  ऊर्जा सुरक्षा आव्हानात्मक मुद्दा बनला आहे. जागतिक तेल व्यापाराचा प्रश्न येतो, तेव्हा भारत स्वत:च्या ऊर्जेच्या सुरक्षेच्या हितासाठी  सर्वोत्तम वाटेल ते करीत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत अधोरेखित केले.

जी-७ शिखर परिषदेच्या दोन्ही सत्रांत पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची स्थिती स्पष्ट केली.  शत्रूता लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचे आवाहन करून त्यांनी  वाद सोडविण्यासाठी  राजनैतिक मार्ग आणि चर्चेचा मार्ग पत्करण्याचे सुचविले, असे विदेश सचिव विनय मोहन क्चात्रा यांनी सोमवारी रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

शिखर परिषदेत रशिया-युक्रेनदरम्यानची स्थिती स्वाभाविकच चर्चेचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता. पंतप्रधान मोदी यांनी हवामान बदल, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा तसेच लैंगिक समानतेवर आयोजित सत्रात रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत या आव्हानात्मक काळात गरजू देशांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याकामी योगदान देण्याच्या दिशेने अग्रणी राहिला आहे.

सोमवारी  जी-७  शिखर परिषदेत युक्रेन संकटाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी  म्हणाले  की, जी-७ शिखर परिषदेसाठी निमंत्रित देश जागतिक तणावाच्या वातावरणात भेटत आहेत. भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे, असे  क्वात्रा यांनी सांगितले.

भेटवस्तूंबाबत सोशलवरही चर्चा...
भारताची समृद्ध कलाकुसर, संस्कृती आणि वारसा दाखवणाऱ्या भेटवस्तू दिल्याबद्दल नेटकऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांना वाराणसीहून मागवलेली गुलाबी मिनेकारी कलाकृती, ओलाफ शॉल्ज यांना मुरादाबादहून मागवलेले कफलिंक आणि ब्रोच दिले. फुमियो किशिदा यांना उत्तर प्रदेशच्या निझामाबादहून मागवलेली काळ्या मातीची भांडी भेट दिली. बोरिस जॉन्सन यांना प्लॅटेनियमचा टी-सेट दिला. इमॅन्यूल मॅक्रो यांना जरदोजीच्या पेटीत अत्तराच्या बाटल्या भेट दिल्या. सिरिल रामफोसा यांना रामायण कथासूत्र असलेली डोक्रा कलाकृती भेट दिली. जोको विडोडो यांना वाराणसी येथील लाखवेअर राम दरबार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिट ट्रुडो यांना काश्मीरमधील हाताने विणलेला रेशमी गालिचा दिला. 

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेचे रक्षण करण्याचा निर्धार
जी-७ समूह आणि भारतासह पाच भागीदार देशांच्या नेत्यांनी सांगितले की, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैविधतेचे रक्षण करण्यासाठी सार्वजनिक संवाद आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन माहितीच्या मुक्त  संचारासाठी कटिबद्ध आहोत. जी-७ शिखर परिषदेदरम्यान सोमवारी जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवदेनात पंतप्रधान मोदी यांनी सर्व नेत्यांना सांगितले की, या तत्त्वाच्या रक्षणासाठी आम्ही तयार असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाचा निर्धार करतो. भारत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याबाबत आग्रही असणाऱ्यांची गळचेपी करीत आहे, असा आरोप होत असतांना हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.

पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातमध्ये
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेनंतर जर्मनीहून मंगळवारी संयुक्त अरब अमितरातच्या दौऱ्यावर रवाना झाले. अबुधाबी विमानतळावर संयुक्त अरब अमिरातचे नवनियुक्त अध्यक्ष आणि शासक शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे शाही परिवारातील वरिष्ठ सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भेट घेऊन संयुक्त अरब अमिरातचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. 

- पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, माझ्या स्वागतासाठी विमानतळावर आल्याने मी माझे बंधू शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या विशेष सद्भावाने प्रभावित आहे. मी त्यांचा आभारी. मागच्या महिन्यात नाहयान यांची संयुक्त अरब अमिरातचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. 
 

Web Title: G-7 summit will do the best for energy security; Prime Minister Narendra Modi played a strong role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.