Veer Savarkar: वीर सावरकरांशी संबंधित देशात किती संग्रहालये आहेत? मोदी सरकारने संसदेत सविस्तर सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:05 PM2023-02-10T17:05:07+5:302023-02-10T17:05:37+5:30
Veer Savarkar: खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
Veer Savarkar: आताच्या घडीला संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. अमेरिकेच्या हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला धन्यवाद देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. यातच संसदेच्या नियमित कामकाजावेळी वीर सावरकरांशी संबंधित देशात किती संग्रहालये आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर केंद्रातील मोदी सरकारच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले.
नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता की, आपल्या देशात वीर सावरकर आणि देशातील इतर स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित संग्रहालयांची संख्या खूप कमी आहे, अथवा असे संग्राहलय आपल्या देशात नाहीत, ही बाब खरी आहे का? या प्रश्नानंतर जी. किशन रेड्डी यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित संग्रहालयांची माहिती संसदेत सादर केली.
देशातील १५ संग्रहालयांची माहिती जारी केली
लेखी उत्तरात जी. किशन रेड्डी यांनी संसदेत एक यादी उपलब्ध करून दिली. यानुसार देशात अशी अनेक संग्रहालये आहेत जिथे स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रीय चळवळ आणि राष्ट्रवादी नेत्यांशी संबंधित माहिती मिळते. परंतु यापैकी एकही संग्रहालय सावरकांशी संबंधित नाही. मंत्री रेड्डी यांनी देशातल्या १५ संग्रहालयांची माहिती जारी केली आहे. यामध्ये १५ संग्रहालयांचा समावेश करण्यात आला आहे. यात दिल्लीतल्या लाल किल्ल्यात असलेले संग्रहालय ‘१८५७ – भारताचा पहिला सातंत्र्य संग्राम’, लाल किल्ल्यातील ‘याद-ए-जलियां’, लाल किल्ल्यातील ‘नेताजी सुभाष चंद्र बोस – भारतीय राष्ट्रीय सेना’, ‘आझादी के दिवाने’ या संग्रहालयांचा समावेश आहे. तसेच गुजरातच्या आणंद येथील ‘सरदार वल्लभ भाई पटेल’ आणि ‘वीर विट्ठल भाई पटेल मेमोरियल म्युझियम’चा समावेश आहे.
दरम्यान, याशिवाय झारखंडच्या रांचीतील ‘बिरसा मुंडा संग्रहालय’, मध्य प्रदेशातील मोरेनामधील ‘शहीद पंडित रामप्रसाद बिस्मिल संग्रहालय’, महाराष्ट्रातील पुणे येथील ‘आगा खान पॅलेसमधील महात्मा गांधी संग्रहालय’, मणिपूरमधील इम्फाळ येथील ‘आयएनए म्य़ुझियम’, ओदिशाच्या कटकमधील ‘नेताजी जन्मस्थळ संग्रहालय’, तामिळनाडूच्या चेन्नई येथील ‘फोर्ट सेंट जॉर्ज संग्रहालय’, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील ‘१८५७ रेसिडेन्सी म्युझियम’, ‘पंडित जीबी पंत लोककला संग्रहालय’, उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूर येथील ‘कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय’ आणि कोलकाता येथील ‘नेताजी रिसर्च ब्युरो, स्वातंत्र्य सैनिक संग्रहालया’चा समावेश असल्याचे लेखी उत्तरात सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"