राजधानी दिल्लीत माकडांचा आवाज काढणाऱ्यांची तैनाती; G20 मुळे निर्णय, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 03:01 PM2023-08-30T15:01:05+5:302023-08-30T15:01:05+5:30
राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये माकडांचा आवाज काढणाऱ्या तज्ञांची तैनाती होणार आहे.
New Delhi G20: राजधानी दिल्लीत येत्या 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात येणार आहेत. त्या सर्वांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, माकडांपासून संरक्षणाची व्यवस्थादेखील केली जात आहे. यासाठी ल्युटियन झोनमध्ये माकडांचे पोस्टर्स लावण्यासोबत माकडांचा आवाज काढण्यासाठी काही लोकांना तैनात करण्यात येणार आहे. एनडीएमसी आणि वन विभागाने यासाठी तयारी केली आहे.
लुटियन झोन परिसरात माकडांचे पोस्टर्स
G20 प्रतिनिधींचे माकडांपासून संरक्षण करण्यासाठी, NDMC आणि वन विभागाने लुटियन झोन परिसरात माकडांचे मोठे पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत, जिथे माकडांची संख्या जास्त आहे. या परिसरात अनेकदा माकडांनी हल्ले केले आहेत, त्यामुळेच ही विशेष काळजी घेतली जात आहे. लुटियन झोनसोबतच, ज्या ठिकाणी परदेशी पाहुणे फिरतील, मुक्काम करतील, त्या ठिकाणीही हे पोस्टर लावले गेले आहेत.
माकडांचा आवाज काढणारे तज्ज्ञ तैनात
माकडांचे पोस्टर लावण्यासोबतच त्यांचा आवाज काढण्यासाठी विभाग तज्ञांना तैनात करेल. IGI विमानतळ, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शास्त्री भवन सारख्या सरकारी इमारती आणि पॉश निवासी क्षेत्रे, या भागात माकडांचा आवाज काढणारे तैनात केले जातील. दरम्यान, राजधानी दिल्लीत माकडांची समस्या कायम असते. त्यामुळेच हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.