अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर बायडेन पहिल्यांदाच भारतात; PM मोदींसोबत या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 08:57 PM2023-09-08T20:57:16+5:302023-09-08T21:02:38+5:30
G20 summit 2023: पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन दिल्लीत पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा -
पीएम मोदी आणि ज्यो बायडेन यांच्या द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यात संरक्षण सहकार्य, दहशतवादाला विरोध करणे, सायबर सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि आर्थिक संबंध, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्र, हवामान बदल, अंतराळ सहकार्य, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक सहकार्य, इंडो-पॅसिफिक, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध आणि तंत्रज्ञान आदींवर चर्चा होऊ शकते.
QUAD च्या विस्तारासंदर्भातही होऊ शकते चर्चा -
भारत आणि अमेरिका यांच्यात इंडो-पॅसिफिकमध्ये दोन्ही देशांच्या भागीदारीवरही चर्चा होऊ शकते. तसेच, एकत्रितपणे QUAD चा विस्तार करण्यासंदर्भातही चर्चा होऊ शकते. याशिवाय दोन्ही देशांमध्ये डिफेन्स क्षेत्रातील भागीदारी, न्यूक्लिअर एनर्जी, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा, चीनच्या विस्तारवादी धोरणास लगाम लावणे, आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, मोदी आणि बायडेन यांच्यात 31 MQ-9B रीपर ड्रोन खरेदीसंदर्भातही चर्चा होऊ शकते. विशेष म्हणजे, या डीलला संरक्षण अधिग्रहण परिषदेनेही मान्यता दिली आहे. अशा अनेक मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा होईल.