G20 Summit: गांधीजींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वाने रुजली भारत-अमेरिका भागीदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:58 AM2023-09-11T06:58:21+5:302023-09-11T07:02:11+5:30
G20 Summit: भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
हनोई - भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बायडेन यांनी म्हटले आहे की, भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे. आज आम्हाला येथे आणल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. व्हिएतनाममधील हनोई येथे अधिकृत भेटीवर असलेल्या बायडेन यांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करताना त्यांचे आणि जी-२० नेत्यांचे छायाचित्रदेखील पोस्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन आणि इतर नेत्यांचे स्वागत केले. जगभरातील या प्रमुख नेत्यांनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. बायडेन यांनी १९ सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, आज राजघाट स्मारकाला भेट देणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब होती. महात्मा गांधींचा अहिंसा, आदर आणि सत्याचा संदेश आज नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तो जगाला प्रेरणा देत राहील.
भारताला ब्रिक्स, क्वाड, जी-७मध्ये सहभागी होण्याचा लाभ
भारताचे माजी विदेश सचिव जी-२०चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रंगला यांनी सांगितले की, भारत जगातील जी-७, ब्रिक्स, क्वाडसारख्या संघटनांमध्ये सहभागी आहे. याचा लाभ त्याला मिळाला आहे. जी-७मध्ये भारत विशेष आमंत्रित सदस्य आहे. यात अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारखे देश व ब्रिक्समध्ये चीन, ब्राझील, रशियासारखे देश, क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया, जपानसारख्या देशांशी चर्चा करण्यात व मतैक्य करणे सोपे झाले.
चिनी पंतप्रधानांचे डोळे दिपले....
बीजिंग : जी-२० शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा कठीण निर्णय घेऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान ली कियांग यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, परंतु नवी दिल्लीत दोन दिवस त्यांना अत्यंत कठीण गेले. भारताने सर्व बाबतीत परिषद यशस्वी करून जो प्रसिद्धीझोत मिळवला, त्यामुळे त्यांचे डोळे अशरश: दिपून गेले.
युक्रेन प्रश्नावर चीन व रशियाचे मतभेद असतानाही भारताने मध्यम मार्ग काढून संयुक्त जाहीरनाम्याला सर्वांचे समर्थन मिळवले. त्याला खुद्द पंतप्रधान ली कियांग यांना समर्थन करावे लागले. हे यजमान भारतासाठी सर्वात मोठे यश आहे. याशिवाय त्यांना पाश्चात्त्य नेत्यांबरोबरच्या बैठकाही कठीण परीक्षा घेणाऱ्या ठरल्या. विशेषत: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चीनच्या प्रसिद्ध ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) मधून माघार घेण्याचे संकेत दिले. शिखर परिषदेच्या गडबडीत भारताने यशस्वी राजनैतिक मोहिमेनंतर आफ्रिकी संघाला जी-२० चा स्थायी सदस्य म्हणून प्रवेश मिळवून दिल्याने भारताची वाहवा झाली.